बेळगाव : गुजरात येथील राजकोट येथे 36 व्या राष्ट्रीय क्रीडा महोत्सवात जलतरण स्पर्धेत 1 मिटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंगमध्ये महिला गटात बेळगावच्या ऋतुजा पवार हिने 6 वा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मेधाली रेडकरने प्रथम क्रमांक, अस्ना चावली गुजरात हिने दुसरा, ऋतिका श्रीराम महाराष्ट्र हिने तिसरा क्रमांक पटकाविला.
राजकोट येथील सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावात आयोजित स्पर्धेत अंतिम 10 खेळाडूंत कर्नाटक बेळगावची ऋतुजा पवार, सुकन्या राव यांनी स्थान मिळविले होते. पहिल्या तीन फेऱयांत ऋतुजा पवार पहिल्या तीन क्रमांकात होती. पण शेवटच्या फेरीत ती सहाव्या क्रमांकावर घसरली.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मेधाली रेडकरने सुवर्ण, गुजराथच्या अस्ना चावलीने रौप्य, महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने कांस्यपदक मिळवले. मध्यप्रदेशच्या पलक शर्माने चौथा, कर्नाटकाच्या सुकन्या राव पाचवा, व ऋतुजा पवार सहावा, बंगालच्या इस्पिता महाजनने सातवा, मध्यप्रदेशच्या भाविका पिंगलीने आठवा, बंगालच्या स्नेहा पॉलने नववा, तर तामिळनाडूच्या मृदुलाने दहावा क्रमांक पटकाविला. कर्नाटकाच्या दोन्ही डायव्हर्स पहिल्या तीन फेरीपर्यंत अव्वल स्थानावर होते. तिला जलतरण एनआयएस प्रशिक्षक विश्वास पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









