190 वर्षांपासूनचा शेंदूर काढून मूर्ती मूळरुपात
दिवसभरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन
कोल्हापूर / प्रतिनिधी
बिनखांबी गणेश मंदिरातील इच्छापूर्ती गणेशाच्या मूर्तीवरील 190 वर्षापासूनचा शेंदूरचा थर काढून मूर्तीला मूळरुपात आणले आहे. यानिमित्त शेंदुराच्या थराच्या आड झाकून गेलेल्या गणेशमूर्तीचे विलोभनीय सौंदर्य उजेडात आले. रविवारी गणेशयागाचे आयोजन करुन गणेशमूर्तीत पुनर्प्राणप्रतिष्ठापनासुद्धा करण्यात आली. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक विधी करण्यात आले. यासाठी पुजारी योगेश व्यवहारे व विकास जोशी यांनी पौराहित्य केले.
बिनखांबी गणेश मंदिरातील मूर्तीला लावलेला शेंदूर काढण्याचे काम देवस्थान समितीने गेल्या 17 जुलैला सुरु केले होते. मूर्ती संवर्धनाचे काम करणारे ऋषीकेश साळुंखे यांनी मूर्तीची अतिशय सावधगिरीने विविध कसोटय़ाच्या आधारे पाहणी केली असता त्यांना गणेशमूर्तीवर एक इंच शेंदूराचा थर असल्याचे दिसून आले. तो काढताना मूर्तीला इजा पोहोचू नये, सौंदर्यातही बाधा येऊ नये याची काळजी घेतली. महिनाभराच्या परिश्रमानंतर मूर्तीला मूळरुपात आणण्यात यश आले. नियोजित कार्यक्रमानुसार रविवारी मंदिरात गणेशयागाचे आयोजन केले. त्याअंतर्गत पुजारी योगेश व्यवहारे व विकास जोशी यांनी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे व पत्नी संयोगिता यांच्या हस्ते पुण्याहवाचन, नवग्रहशांती, नांधी श्राद्ध असे विधी करवून घेतले. यावेळी अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे व मंदिरातील सीसीटीव्ही नियंक्षण कक्षाचे नियंत्रक राहुल जगताप उपस्थित होते.
विधी झाल्यानंतर शिखरावरील कळसाला पंचामृताचा अभिषेक करुन कुंभी, कासारी, गुप्त सरस्वती, कृष्णा व भोगावती नद्यांच्या पाण्याने गंगोत्रीस्नान घातले. तसेच मंदिरातील मूर्तीलाही गंगोत्रीस्नान घालून मूर्तीत पुनर्प्राणप्रतिष्ठापना केली. लोकसहभागातून तयार केलेला चांदीचा किरीटही मूर्तीला घालण्यात आला. तसेच चांदीमध्ये तयार केलेले दोन हात गणेशमूर्तीला घालण्यात आले. यानंतर आरती करुन गणेशमूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली केली.
भाविकांनी चांदी दान केली…
गणेशमूर्तीला दागिने करण्यासाठी गणेशभक्त प्रथमेश योगेश पाटील यांनी अर्धा किलो तर मारुतीराव रवळनाथ देसाई-सरकार यांनी 55 ग्रॅम चांदी दान केली आहे. औंध (पुणे) येथील बांधकाम व्यावसायिक निता खर्डे-पाटील यांच्याकडूनही लवकरच गणेशमूर्तीला चांदीचा मोठा हार अर्पण केला जाणार आहे, असे देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.









