आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप : भारताला एकूण पाच पदके
मुस्कान/ वृत्तसंस्था
अम्मान, जॉर्डन येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या रीतिका हुडाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या फ्रीस्टाईल 76 किलो वजन गटात तिने हे पदक मिळविले. 2023 मध्ये तिने या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. मानसी लाथेर व मुस्कान यांनीही येथे कांस्यपदक मिळविले.
अंतिम फेरीत तिला किर्गिझस्तानच्या ऐपेरी मेडेट कीझीकडून 7-6 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. या लढतीत रीतिकाने 6-2 अशी आघाडी घेत जेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली होती. पण अखेरच्या 10 सेकंदात तिची घसरण झाली आणि तिला केवळ एका गुणाने पराभव स्वीकारावा लागला. ऐपेरीकडून रीतिकाला दुसऱ्यांदा पराभूत व्हावे लागले. याआधी 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत रीतिकाला 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर निकषाच्या आधारावर तिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
येथे अंतिम फेरी गाठण्याआधी रीतिकाने जपानच्या नोडोका यामामोटोवर चीतपट विजय मिळवित पदक निश्चित केले होते. उपांत्यपूर्व फेरीत रीतिकाने कोरियाच्या सेओयेऑन जेआँगवर 10-0 असा तांत्रिक सरसतेवर विजय मिळविला होता. मुस्कान व मानसी लाथेर यांनी महिलांच्या 59 किलो व 68 किलो वजन गटात कांस्यपदके मिळविली. 17 वर्षीय मुस्कानला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या सकुरा ओनिशीकडून 12-2 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. पण कांस्यपदकाच्या लढतीत तिने जिगरबाज प्रदर्शन करीत मंगोलियाच्या अल्टजिन टॉगतोखवर 4-0 असा विजय मिळवित रेपेचेज फेरीतून संधी मिळाल्यावर कांस्यपदक जिंकले. 18 वर्षीय लाथेरने वरिष्ठ विभागात आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले. तिने कझाकच्या इरिना काझ्युलिनाचा 12-2 असा पराभव करून कांस्य मिळविले. तिला उपांत्य फेरीत चीनच्या झेलू लि हिच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. झेलूने या गटात सुवर्णपदक पटकावले.
या तीन पदकानंतर या स्पर्धेत भारताची एकूण पाच पदके झाली आहेत. ग्रीको रोमन प्रकारात पहिल्या दोन दिवशी नितेश (97 किलो) व सुनील कुमार (87 किलो) यांनी कांस्यपदके मिळविली होती. अंकुश (50 किलो) व निशू (55 किलो) या अन्य दोन भारतीयांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पात्रता फेरीत अंकुशला जपानच्या रेमिमा योशिमोटोने तांत्रिक सरसतेवर हरविले. रेमिमाने नंतर सुवर्णपदक मिळविले. अंकुशला रेपेचेजमार्फत कांस्यपदकाची लढत खेळण्याची संधी मिळाली. पण दुखापतीमुळे त्याने माघार घेतल्याने कोरियाच्या मिरान चेऑनला कांस्य मिळाले. निशू मंगोलियाच्या ओटगुनतुया बायानमन्खकडून कांस्यपदकाच्या लढतीत चीतपट झाली. रेपेचेज फेरीतून तिला लढतीत खेळण्याची संधी मिळाली होती.









