वृत्तसंस्था / छत्तीसगड
2025-26 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या इलाईट ब गटातील सामन्यात सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉने दमदार आणि जलद द्विशतक झळकविले. रणजी स्पर्धेच्या इतिहासात पृथ्वी शॉचे हे 141 चेंडूत नोंदविलेले तिसऱ्या क्रमांकाचे जलद द्विशतक आहे.
चंदीगड आणि महाराष्ट्र यांच्यात सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या पृथ्वी शॉने दुसऱ्या डावात आपले शतक केवळ 72 चेंडूत नोंदविले. त्यानंतर त्याने 150 धावांचा टप्पा 105 चेंडूत तर द्विशतक 141 चेंडूत झळकविले. शॉने सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी 5 षटकार आणि 29 चौकारांसह 156 चेंडूत 222 धावांची खेळी केली. महाराष्ट्राने बिनबाद 66 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पृथ्वी शॉ आणि अर्शिन कुलकर्णी यांनी सलामीच्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी केली. कुलकर्णीने 4 चौकारांसह 31 धावा जमविल्या. तो बाद झाल्यानंतर शॉ आणि सिद्धेश वीर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 197 धावांची भागिदारी केली. सिद्धेश वीरने 83 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 62 धावा जमविल्या. कर्णधार गायकवाड आणि शॉ यांनी तिसऱ्या गड्यासाठी 78 धावांची भर घातली. शॉ बाद झाल्यानंतर काही वेळातच महाराष्ट्राने आपला दुसरा डाव 52 षटकात 3 बाद 359 धावांवर घोषित करुन चंदीगडला निर्णायक विजयासाठी 464 धावांचे कठीण आव्हान दिले.
तिसऱ्या दिवसाअखेर चंदीगडने दुसऱ्या डावात 34 षटकात 1 बाद 129 धावा जमविल्या. अर्जुन आझाद 3 षटकार आणि 8 चौकारांसह 63 तर कर्णधार व्होरा 4 चौकारांसह 53 धावांवर खेळत आहेत. या सामन्यातील खेळाचा एक दिवस बाकी असून चंदीगडला विजयासाठी आणखी 353 धावांची जरुरी आहे.
संक्षिप्त धावफलक: महाराष्ट्र प. डाव 313, चंदीगड प. डाव 209, महाराष्ट्र दु. डाव 52 षटकात 3 बाद 359 डाव घोषित (पृथ्वी शॉ 222, सिद्धेश वीर 62, कुलकर्णी 31, गायकवाड नाबाद 36), चंदीगड दु. डाव 34 षटकात 1 बाद 129 (अर्जुन आझाद खेळत आहे 63, मनन व्होरा खेळत आहे 53).









