भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय : उपनगराध्यपदी दीपा कोलवेकर शक्य
फोंडा: फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीत 15 पैकी 10 जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केलेल्या भाजपा पॅनलमधून नगराध्यक्षपदासाठी रितेश रवी नाईक यांचे नाव निश्चित झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवऊन रितेश यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आज सोमवारी ते या पदासाठी अर्ज भरणार आहेत. उपनगराध्यक्षपदी दीपा शांताराम कोलवेकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. फोंड्याचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांच्याकडे सध्या नगराध्यक्षपदाचा ताबा असून येत्या 20 मे रोजी पालिका मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. मंगळवार 16 रोजी सकाळी नगराध्यक्ष व उपनगराध्यपदाची निवड होऊन नवीन पालिका मंडळ ताबा घेणार आहे. रितेश नाईक हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. भाजपा पॅनलमधून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी रितेश नाईक यांच्यासह विरेंद्र ढवळीकर व विश्वनाथ दळवी यांची नगराध्यक्षपदासाठी नावे चर्चेत होती. शनिवारी रात्री पणजी येथे झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत रितेश नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे. माजी नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांच्या पत्नी दीपा कोलवेकर या पहिल्यांदाच निवडून आल्या असून उपनगराध्यक्ष म्हणून त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहेत. दरम्यान भाजपा पॅनल व्यतिरिक्त मगो रायझिंग फोंडा पॅनलचे चार उमेदवार व एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. अपक्ष नगरसेवक व्यंकटेश उर्फ दादा नाईक हे नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यांनी अर्ज भरल्यास मगो पक्षाचे चार उमेदवार त्यांना पाठिंबा देऊ शकतात.









