राज कुमार गुप्ता यांचा आगामी प्रोजेक्ट
बॉलिवूड दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांना ‘रेड’, ‘नो वन किल्ड जेसिका’ यासारख्या उत्तम चित्रपटांसाठी ओळखले जाते. दिग्दर्शक गुप्ता आता वेबसीरिज निर्मितीच्या तयारीत आहेत. राजकुमार गुप्ता यांच्या या वेबसीरिजमध्ये रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसून येणार असल्याचे मानले जात आहे.
या वेबसीरिजची कहाणी फार्मसी उद्योगावर आधारित आहे. या सीरिजला यश मिळाल्यास याचे अनेक सीझन तयार केले जाणार आहेत. रितेश या कहाणीसाठी अत्यंत योग्य असल्याचे दिग्दर्शकाचे मानणे आहे. राजकुमार गुप्ता यांनी यापूर्वी ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’ हा चित्रपट तयार केला होता.
तर रितेश यापूर्वी ‘वेड’ या मराठी चित्रपटात दिसून आला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची पत्नी जेनेलिया देशमुख देखील झळकली होती. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंत पडली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. रितेश आणि जेनेलिया ही बी टाउनमधील सर्वात पसंतीच्या दांपत्यापैकी एक आहेत.
रितेश लवकरच सोनाक्षी सिन्हासोबत ’काकुडा’ या चित्रपटात दिसून येणार आहे. तर साकिब सलीम देखील या चित्रपटातून झळकणार आहे. ‘काकुडा’ हा एक हॉरर कॉमेडी धाटणीचा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करत आहे.









