प्रतापगड :
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुख यांनी आपल्या आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवछत्रपती च्या शूटिंगसाठी लोकेशन पाहणी करण्यासाठी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे आगमन केले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या पवित्र स्थळाच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वैभवाने प्रभावित होत त्यांनी विविध स्थळांची पाहणी केली.
या दौऱ्यात रितेश देशमुख यांनी कृष्णामाई मंदिर परिसराला भेट देऊन दर्शन घेतले. कृष्णामाईच्या दर्शनावेळी ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंना सुवर्णतुला केल्याचा प्रसंग दर्शविणारे चित्र भेट देण्यात आले. या दुर्मीळ भेटवस्तूचा स्वीकार करताना रितेश देशमुख भावूक झाले. त्यांनी छत्रपतींच्या जीवन गौरवातून प्रत्येकाला प्रेरणा मिळते, असे सांगत “राजा शिवछत्रपती” या चित्रपटाद्वारे शिवचरित्र भव्य व ऐतिहासिक पद्धतीने उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यानंतर त्यांनी श्री क्षेत्र महाबळेश्वर व परिसरातील विविध धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळांना भेट दिली. या ठिकाणांची अनोखी शोभा व ऐतिहासिक महत्त्व पाहून ते प्रभावित झाले. “या परिसरातील लोकेशन्स चित्रपटाच्या भव्यतेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर लवकरच येथे शूटिंग सुरू करण्याचा मानस आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या भेटीच्या प्रसंगी श्री क्षेत्र महाबळेश्वरमधील युवा कार्यकर्ते प्रदीप कात्रट, सरपंच सुनील बिरामणे, महाबळेश्वर अर्बन बँकेचे संचालक प्रशांत कात्रट, तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक ग्रामस्थांनी रितेश देशमुख यांच्या या ऐतिहासिक उपक्रमाचे स्वागत करत, “श्री क्षेत्र महाबळेश्वरचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा चित्रपटाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचावा,” अशी आशा व्यक्त केली.








