बंदी असतानाही चिनी मांजाचा सर्रास होतोय वापर : अपघातांचे सत्र सुरूच
बेळगाव : संक्रांतीच्या सणामध्ये पतंग उडविण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. परंतु या परंपरेमध्ये काही चुकीच्या पद्धती आल्याने पतंग उडविणे हे इतरांसाठी जीवघेणे ठरू लागले आहे. नायलॉनच्या चिनी मांजावर बंदी असतानाही सर्रास विक्री केली जात आहे. मागील काही वर्षांत चिनी मांजामुळे बेळगावमध्ये अनेक अपघात घडले आहेतच, त्याचबरोबर एका महिलेचा जीवदेखील गेला आहे. सध्या शहरात पुन्हा चिनी मांजाची विक्री जोमात असून आणखी एखादा जीव जाण्यापूर्वी यावर बंदी आणणे गरजेचे आहे. पतंग उडविण्याच्या स्पर्धा रंगू लागल्या आणि यातूनच विचित्र प्रकार सुरू झाला. दोऱ्याला काचेची भुकटी फेव्हिकॉलच्या साहाय्याने लावून एकमेकांचा पतंग कापण्याची स्पर्धा सुरू झाली. पूर्वी हाताने काचेची भुकटी लावली जात होती. परंतु सध्या चिनी मांजाच उपलब्ध होत आहे.
हा मांजा शहरातील बऱ्याच दुकानांमध्ये विक्री केला जात असल्याचे निदर्शनास येते. बंदी असूनही पोलिसांचा धाक नसल्याने राजरोसपणे विक्री सुरू आहे. चिनी मांजाचा फास लागल्याने दोन वर्षांपूर्वी बेळगावमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर दिखाव्यासाठी काही दुकानांवर कारवाई करण्यात आली. दोन-तीन महिने चिनी मांजाची विक्री बंद ठेवण्यात आली. त्यानंतर पुन्हा विक्री सुरू झाली. याविषयी दुकानदारांना विचारले असता तरुणांकडून दुप्पट दराने चिनी मांजा खरेदी केला जात असल्याने छुप्या मार्गाने विक्री केली जाते, असे सांगण्यात आले. मंगळवारी केवळ एका दिवसात महाराष्ट्रात चिनी मांजामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. तर बेळगावमध्ये मांजात सापडलेला पक्षी सामाजिक कार्यकर्त्यांनी सोडविला. यामुळे पुन्हा एकदा चिनी मांजा चर्चेचा विषय ठरला आहे. बंदी असतानाही विक्री होतेच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पक्षी कायमचे जायबंदी
चिनी मांजात अडकल्याने पक्ष्यांचे पंख छाटले जातात. बऱ्याच जणांचे पाय कायमचे निकामी होतात. मांजामधून सुटका न झाल्याने काही पक्षी तेथेच शेवटचा श्वास घेतात. या मांजाचा फटका पक्ष्यांसोबत प्राण्यांनाही बसताना दिसतो. तुटलेला मांजा वर्षानुवर्षे झाडांवर पडून असतो. हा मांजा नष्ट होत नसल्यामुळे पुढे त्याचा फटका इतरांनाही बसतोच. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून अनेकवेळा आवाज उठविला जातो. परंतु त्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.
उड्डाणपुलावरील वाहतूक धोक्याची
पतंग उडविताना तुटलेला अथवा हातातून सुटलेला मांजा पतंगासोबत दूरपर्यंत जातो. बेळगावमध्ये कपिलेश्वर उड्डाणपूल, छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल, तिसरे रेल्वेगेट उड्डाणपूल,गांधीनगर येथील उड्डाणपुलावर बऱ्याचवेळा चिनी मांजा येऊन पडलेला दिसतो. वेगाने येणारे वाहनचालक या मांजामध्ये अडकले जातात. त्यामुळे डोके, तोंड, तसेच गळा, हातांना मांजा घासून मोठी दुखापत होते. अंगाला मांजा लागल्यानंतर घाबरून हातातून वाहने सोडल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलावरून ये-जा करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.









