बेळगाव : हिंदवाडी येथील अनेक विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. बऱ्याचशा अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने ते पाणी नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने धोक्याचे ठरत आहे. त्यातच आर. के. मार्ग, सहावा क्रॉस येथे महानगरपालिकेतर्फे ड्रेनेज चेंबर उघडेच ठेवून काही काम सुरू करण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांपासून हे चेंबर तसेच उघडे असून तेथे हिंदवाडीतील गजानन अपार्टमेंटसह अन्यत्र या चेंबरमधील दूषित पाणी पसरत आहे. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याच ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंतची शाळा असून या मुलांच्या आरोग्याचा विचार कोण करणार? असा प्रश्न या परिसरातील नागरिक करत आहेत.
परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी समस्या निवारण करा
गेल्या पंधरा दिवसांपासून ही परिस्थिती कायम असून येथील लोकांनी महानगरपालिकेला आणि संबंधित विभागाला याबाबत माहिती दिली तरी अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या समस्येचे निवारण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









