इम्रान खान यांच्या मोर्चामुळे गृह मंत्रालयाचा इशारा
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी सुरू केलेल्या हकीकी आझादी मोर्चाबाबत गृह मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानमध्ये गृहयुद्धाचा धोका असून सरकारी कर्मचाऱयांनी सतर्क राहून हकीकी आझादी मोर्चापासून दूर राहावे, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त सुरक्षा तैनात करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाल्यास सरकारकडून इम्रान खान यांना अटक केली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, अटकेची कारवाई झाल्यास वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता गृहीत धरून शाहबाज शरीफ सरकार या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहे.
इम्रान खान यांनी लाहोरमधील लिबर्टी चौक ते इस्लामाबादपर्यंत हकीकी आझादी मार्चची घोषणा केली आहे. नॅशनल असेंब्ली बरखास्त करून पाकिस्तानमध्ये तात्काळ मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी इम्रान खान यांनी केली आहे. हकीकी आझादी मार्चला लाहोर येथून सुरुवात झाली असून ती निश्चित मार्गांवरून जाईल असा दावा केला जात आहे. इम्रान खान यांची ही दुसरी पदयात्रा आहे. यापूर्वी मे महिन्यातही त्यांनी असाच मोर्चा काढला होता.
13,000 सुरक्षा जवान तैनात
हकीकी आझादी मार्चच्या स्थितीवर नजर ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाने 13,000 सुरक्षा जवान-अधिकारी तैनात केले आहेत. मात्र, हकीकी आझादी मार्च शांततेत होईल, असे इम्रान खान आणि त्यांचा पक्ष वारंवार सांगत आहेत. मात्र, मोर्चादरम्यान कायदा मोडणाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्या मोर्चाला अनुमती दिली असली तरी आंदोलकांनी कायद्याचे पालन केलेच पाहिजे, असे स्पष्ट केले आहे.
लाँगमार्च इस्लामाबादला धडकणार
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा ‘आझादी मार्च’ शुक्रवारी लाहोरहून इस्लामाबादच्या दिशेने रवाना झाला आहे. इम्रान यांचा पक्ष पीटीआयने काढलेल्या या मोर्चासाठी लाहोरमधील लिबर्टी चौकात इम्रान समर्थक एकत्र झाले होते. स्वतः इम्रान खानही या मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यांनी मोर्चा निघण्यापूर्वी समर्थकांना संबोधितही केले. हा मोर्चा केनियामध्ये हत्या झालेल्या पत्रकार अर्शद शरीफ यांना समर्पित करण्यात आला आहे. इस्लामाबादला पोहोचणारा मोर्चा रोखण्यासाठी येथे मोठय़ा प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. मोर्चादरम्यान आंदोलकांना रोखण्यासाठी आणि बिघडलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राजधानीत अधिकाधिक सज्जता पाळण्यात येत आहे.









