उगवे पेडणेतील कलाकारांचा समावेश : पुढील पिढीच्या माहितीसाठी उपयोगी ठरणार

प्रतिनिधी /पेडणे
ग्रामीण भागातील पारंपरीक जुन्या खाद्य संस्कुतीची जेवणावळी यांची नव्या पिढीला ओळख व्हावी, यासाठी दूरदर्शनच्या ‘शिर्ती’ कार्यक्रमात उगवे पेडणे या गावातील स्थानिक कलाकारांचा माहीतीपट सोमवार दि. 29 रोजी सायं. 4.10 वाजता गोवा दूरदर्शनवर दाखविला जाणार आहे.

पेडणे तालुक्मयातील उगवे गाव सामाजिक एकात्मता जोपासणारा गाव प्रसिद्ध आहे. या गावाने विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविणारे शेकडो कलाकार गोमंतकाला दिले. प्रत्येक कलाक्षेत्रात उगवेतील कलाकाराचा समावेश असतो. या गावातील अनेक नागरिक उच्चपदावर अधिकारी तसेच साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत.
या गावचे सुपुत्र युवा कलाकार ईशांक महाले यानी ‘शिर्ती’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे. रोहित सोनाळकर, महेश गोकर्णकर रुतुराज व क्षीतीज उगवेकर यांनी साहाय्यक म्हणून काम केले आहे. सामग्रीपट देऊबाबलो महाले तर व्यवस्थापन प्रभाकर महाले व एकनाथ यांनी केले आहे. निर्मिती उदय श्रीधर कामत यांनी केली आहे. या कार्यक्रमात उगवेतील सुमारे पंचेचाळीस कलाकार सहभागी झाले आहेत.
उगवे गावात पूर्वीपासून चालत आलेल्या समारंभात किंवा सार्वजनिक क्षेत्रात कोणकोणत्या प्रकारचे खाद्य पदार्थ असायचे त्यासाठी लागणारे साहित्य कसे जमवायचे जंगलात किंवा आपल्या सभोवताली ज्या रानात वस्तु मिळायच्या त्यांचा कसा वापर करायचे याची माहिती या ‘शिर्ती’ या माहीतीपटातून दिली जाणार आहे. काही पद्धती कालबाह्य़ झाल्या असल्या तरी किंवा केवळ रितीरिवाज म्हणून त्या नावापुरत्याच आज करीत असल्या तरी त्या काळी किंवा भविष्यात त्यांचा सजीवसृष्टीला वरदान म्हणून कसा उपयोग होईल, याची माहिती पुढच्या पिढीला मिळावी म्हणून या माहितीपटाची निर्मीती केली आहे.
या माहीतीपटाच्या निर्मितीसाठी उगवेतील तमाम नागरिकांनी बरीच मेहनत घेतली आहे. त्यात उगवेचे सरपंच सुबोध महाले, पंचायत सदस्य आश्विनी महाले व समीक्षा महाल यांचा मोठा सहभाग आहे. याशिवाय देवस्थानचे मानकरी, मोठय़ा पंगतीचे जेवण बनवणारे स्थानिक बुजूर्ग नागरिक यानींही उत्साहाने सहभाग दाखवला आहे
उगवेचा सार्थ अभिमान : सरपंच सुबोध महाले
आमच्या तीनही गावात पारंपरिक असे अनेक वार्षिक कार्यक्रम साजरे होतात व त्यात गावातील लोक मोठय़ा उत्साहाने सहभागी होतात. उगवेचे ईशांक महाले आणि त्यांच्या सहकाऱयानी हा माहितीपट तयार करण्यास मेहनत घेतली. यात सहभागी असलेल्या गावातील स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम गोवा दूरदर्शनवर पोहोचला याचा आपल्याला सार्थ आभिमान आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच सुबोध महाले यांनी दिली.
‘शिर्ती’ पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल !
शिर्ती कार्यक्रमाचे दिग्दर्शक ईशांक महाले म्हणाले, आपल्या पुर्वजानी गावागावात अनेक चालीरीती चालू केल्या होत्या. त्यांचा उद्देशही तेव्हा चांगला दूरदर्शी होता. आपल्या जेवणात जंगलातील कंदमुळे रान-मेवा यांचा सहभाग आपल्या आरोग्यासाठी कसा लाभदायक आहे, हे लिखित स्वरुपात ठेवणे त्यांना शिक्षणा आभावी शक्मय नव्हते. यासाठी त्यांनी वेगवेगळे उत्सव व त्या उत्सवात अशा वस्तुंचा अनिवार्य वापर करून ठेवला आहे. परंतु ते अशिक्षित असुनही त्यांनी आमच्यासाठी जे संचित करुन ठेवले ते आजचा शिक्षित समाज विसरत चालला आहे. त्यामुळे पुढील पीढीला एक पुरावा म्हणून हा माहीतीपट खुपच मार्गदर्शक ठरेल, असे या माहितीपटाचे दिग्दर्शक ईशांक महाले म्हणाले.
गोवा दूरदर्शन ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन ग्रामीण खाद्य संस्कृती आणि परंपरा याचा शोध आणि बोध घेतला आहे. ‘शिर्ती’ या नावाने माहितीपट तयार करून ग्रामीण भागातील कलाकाराना उत्तेजन दिले आहे. याबाबत दूरर्शनचे तोरसे जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे निर्माते उदय कामत यांचे हे कार्य मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
एतिहासिक ठेवा म्हणून जतन करावा!
भविष्यात गोव्यातील खेडय़ात जाऊन अशा कलाकारांना शोधून काढून त्या – त्या गावची लोकसंस्कृती दूरदर्शनने गोळा करून समाजासमोर ठेवावी व ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिर्ती या मालिकेतील जी उगवे गावची परंपरा प्रसारित होईल. हा इतिहास म्हणून ठेवा म्हणून जतन करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, अशी प्रतिक्रिया सीमा रामा खडपे यांनी दिली.









