मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला भगवा खांद्यावर
प्रतिनिधी/ सातारा
ऋषिकांत शिंदे हे पडद्यामागचे सुत्रधार असे आजपर्यंतचे चित्र समजले जात होते. आमदार शशिकांत शिंदे यांना आमदार करण्यामध्ये सख्खा भाऊ ऋषिकांत हे निर्भीडपणे उभे असायचे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार शशिकांत शिंदे हे एकेक पायरी वर चढत असतानाच दुसऱ्या बाजूला ऋषिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भगवा खांद्यावर घेत शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान, मीडियाशी बोलताना ऋषिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्षात राजकीय कुरघोड्यांमुळे मला निर्णय घ्यावा लागला असे स्पष्टीकरण दिले. तर आमदार शशिकांत शिंदे यांनी तुम्ही माझे कुटुंब फोडले मी तुमची युती फोडणार असा विडाच विटा येथील कार्यक्रमात उचलला आहे.
सातारा जिह्यात जावलीमध्ये राजकारण वेगळया पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष स्थापनेपासून बदलत गेलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या आधी शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग होता. एवढेच काय राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार शशिकांत शिंदे हेही पूर्वी शिवसेनेतच होते. परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जावलीतून आमदारकी लढवली. यामध्ये पडद्यामागे खंबीरपणे व्युहरचना करणारे त्यांचे बंधू ऋषिकांत शिंदे हे होते. त्यांनीच शनिवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगवा खांद्यावर घेत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्याच दरम्यान, इकडे साताऱ्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडून राष्ट्रवादी भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाषणातून जोरदारपणे टीका सुऊ होती. मात्र, दुसरीकडे मुंबईत त्यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी जाहीर प्रवेश केल्याचे वृत्त रविवारी सकाळी पसरताच जिह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ऋषिकांत शिंदे यांचा पक्षप्रवेश झाला. नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले, झोपडपट्टी पूनर्वसन विकास राज्यमंत्री दर्जा विजय नाहटा, वाशी नवी मुंबई शिवसेना संपर्क प्रमुख माजी नगरसेवक किशोर पाटकर, घणसोली येथील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षांतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेत प्रवेश- ऋषिकांत शिंदे
राष्ट्रवादी पक्षात असणारी गद्दारी व अंतर्गत असणारे मतभेद, समन्वयाचा अभाव व गतवेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत माझा पक्षांतर्गतच कुरघोड्यामुळे जाणीवपूर्वक केलेला पराभव. या पार्श्वभूमीवर मी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे, असे स्पष्टीकरण माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केले. नवी मुंबईमध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत. त्या कामांना न्याय देण्यासाठी माथाडी कामगारांना खऱ्या अर्थाने त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नपूर्तीसाठी मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे ऋषिकांत शिंदे यांनी सांगितले.







