माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याकडे परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी, भारतीय वंशाच्या सुएला ब्र्रेव्हरमन यांची हकालपट्टी
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोमवारी आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले. त्यांनी माजी पंतप्रधान डेव्हिड पॅमेरून यांची ब्रिटनचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली. तसेच भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला ब्र्रेव्हरमन यांना बडतर्फ करण्यात आले. तसेच आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी जेम्स क्लेवरली यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपल्या सरकारच्या गृहमंत्री सुएला ब्र्रेव्हरमन यांची हकालपट्टी केली आहे. ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. यावेळी जमावाने पोलिसांवर हल्ला केला. यानंतर पॅलेस्टिनी समर्थक आंदोलकांप्रती पोलीस अतिशय मवाळ असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर रविवारी त्यांनी पोलिसांच्या समर्थनार्थ आपले वक्तव्य केले. त्यांच्या या पवित्र्याचा फटका ब्रेव्हरमन यांना बसला असून त्या आपली खुर्ची राखण्यात असफल ठरल्या आहेत. 43 वषीय सुएला ब्र्रेव्हरमन या पूर्वीच्या बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अॅटर्नी जनरल होत्या. त्या हिंदू-तामिळ कुटुंबातील आहेत. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1980 रोजी लंडनमध्ये झाला. त्या वेम्बली येथे वास्तव्यास असून त्यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ब्र्रेव्हरमन यांच्या जागी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हरली यांना गृह मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय डेव्हिड पॅमेरून यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच ते परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास व्यवहार खात्याचे सचिवपद सांभाळतील.
कॅमेरून यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन धक्कादायक आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर माजी पंतप्रधान मंत्रिमंडळात परतण्याची ही दुसरी वेळ आहे. कॅमेरून यांनी 2016 मध्ये ब्रिटनने बोलावलेल्या सार्वमतामध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी मतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. पॅमेरून 2010 ते 2016 पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते. किंबहुना, या सार्वमतामध्ये बहुतांश लोकांनी युरोपियन युनियनमधून ब्रिटन वेगळे होण्याच्या बाजूने मतदान केले होते. ब्र्रेक्झिटवरील सार्वमतानंतर त्यांनी पंतप्रधानपद सोडले होते.
पंतप्रधानांना योग्य साथ देणार : कॅमेरून
पंतप्रधानांनी मला परराष्ट्रमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले असून ते मी मान्य केले आहे, असे कॅमेरून यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मी गेली सात वर्षे राजकारणापासून दूर आहे, मला आशा आहे की, 11 वर्षे कंझर्व्हेटिव्ह नेता आणि सहा वर्षे पंतप्रधान म्हणून माझा अनुभव महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पंतप्रधानांना मदत करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या युव्रेनमधील युद्ध आणि मध्य-पूर्वेतील संकट यासह आंतरराष्ट्रीय आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे ते म्हणाले.









