पॅन इंडिया चित्रपटात साकारणार भूमिका
कन्नड चित्रपटांचा अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याने ‘कांतारा’ या चित्रपटाद्वारे मागील वर्षी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळविले होते. ‘कांतारा’मुळे ऋषभ देशात मोठा स्टार म्हणून ओळखला गेला. एकीकडे ऋषभ आता ‘कांतारा 2’ या चित्रपटावर काम करत असताना तो आशुतोष गोवारिकर यांच्या चित्रपटात दिसून येणार असल्याचे समजते.
ऋषभ शेट्टी पहिल्यांदाच एका पॅन-इंडिया चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर करणार आहेत. बॉलिवूडला ‘लगान’, ‘स्वदेस’ आणि ‘जोधा अकबर’ यासारखे चित्रपट देणारे दिग्दर्शक गोवारिकर आणि ऋषभ यांच्यात एका प्रोजेक्टबद्दल सहमती झाली आहे. मागील काही महिन्यांमध्ये गोवारिकर यांनी ऋषभ याची अनेकदा भेट घेतली होती. स्वत: एक लेखक असल्याने ऋषभने पटकथेकरता आशुतोष गोवारिकर यांना सहकार्य केले आहे.
कांतारा 2 या चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाल्यावर ऋषभ या नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या नव्या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होण्याची अपेक्षा आहे. गोवारिकर हे पुढील दोन महिन्यांमध्ये चित्रपट निर्मितीपूर्व टप्प्यात नेणार आहेत.









