वृत्तसंस्था/ डेहराडून
वाहन दुर्घटनेत गंभीर जखमी झालेला भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज रिषभ पंत याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या शुक्रवारी पंतच्या वाहनाचा अपघात झाला होता. त्याच्या वाहनाने डीव्हायडरला जोरदार धडक दिली होती आणि काही क्षणातच त्याच्या वाहनाने पेट घेतला होता.
पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला तातडीने डेहराडून येथे हलविण्यात आले. येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू असून त्याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. यापूर्वी त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्याच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा होत असल्याचे दिसून आल्याने त्याला आयसीयूमधून रविवारी रात्री खाजगी वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी रविवारी मॅक्स हॉस्पिटलमध्ये जाऊन पंतच्या प्रकृतीची चौकशी केली. या अपघातामध्ये पंतच्या पायाला तसेच डोक्याला आणि चेहऱयावरही दुखापती झाल्या आहेत. पंतच्या प्रकृतीमध्ये यापुढे अधिक सुधारणा होईल, अशी आशा त्याच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी व्यक्त केली.









