आयसीसी कसोटी क्रमवारी : गोलंदाजीत बुमराह नंबर 1 !
वृत्तसंस्था/ दुबई
लीड्समधील पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडने टीम इंडियाला 5 विकेट्सने पराभूत केले. या पराभवानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शतके झळकावणाऱ्या ऋषभ पंतने फलंदाजीत क्रमवारीत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. याशिवाय, गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमराह अव्वलस्थानी कायम आहे.
आयसीसीच्या नव्या कसोटी क्रमवारीत पंत एका स्थानाच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात आता 801 गुण जमा झाले आहेत. ही पंतची आयसीसीच्या कसोटी क्रमावीरीतील आतापर्यंतची सर्वोत्तम रँकिंग आहे. याशिवाय, पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने पहिल्या डावातील अर्धशतकानंतर दुसऱ्या डावात शतकी खेळी केली होती. तोही पाच स्थानांनी झेप घेत करिअरमधील सर्वोत्तम आठव्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलनेही पहिल्या डावात शतक झळकावले. त्याने 5 स्थानांची झेप घेतली असून तो 20 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर ऑली पोपने 3 स्थानांची झेप घेत 19 वे स्थान गाठले आहे.
बुमराह-रुटचे अव्वलस्थान कायम
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि फलंदाजीत जो रुटची बादशाहत कायम आहे. जसप्रीत बुमराहनं इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. तो 907 रेटिंग पॉइंट्ससह गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानावर कायम आहे. बुमराहची करिअरमधील बेस्ट रँकिंगचा आकडा 908 असून इंग्लंड दौऱ्यावर तो नवा रेकॉर्ड प्रस्थापित करु शकतो. आफ्रिकेचा रबाडा दुसऱ्या स्थानी असून ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.
कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम बेस्ट रँकिंग 932 असलेला जो रुट सध्याच्या घडीला 889 गुणासह नंबर वनवर कायम आहे. त्याच्यापाठोपाठ इंग्लंडचा स्टार हॅरी ब्रूक 874 गुणासह दुसऱ्या स्थानावर असून न्यूझीलंडच्या केन विल्यमसन (867) पाठोपाठ यशस्वी जैस्वाल 851 गुणासह चौथ्या स्थानावर आहे.









