नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा प्रसिद्ध यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याला पुढील उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आले असून त्याच्या दुखावलेल्या गुढघ्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. 30 डिसेंबरला तो दिल्लीत एका भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या गुढघ्याच्या स्नायूंना दुखापत झाली असून त्यामुळे शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली.
बुधवारी त्याला एअर अँब्युलन्सने दिल्लीहून मुंबईत आणण्यात आले. तो प्रवासी विमानाने प्रवास करण्याच्या स्थितीत नसल्याने एअर अँब्युलन्सची व्यवस्था करावी लागली. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मुंबईत विख्यात अस्थितज्ञ दिनशॉ परदीवाला हे त्याच्यावर उपचार करणार आहेत. परदीवाला हे क्रीडापटूंवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मुंबईत रिषभ पंत याला कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो थेट डॉ. परदीवाला यांच्या देखरेखीखाली राहणार आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर तो पूर्णतः बरा होईपर्यंत, तसेच त्याचे योग्य प्रकारे पुनर्वसन होईपर्यंत लक्ष ठेवणार आहे.
पूर्ण साहाय्य पुरविणार
रिषभ पंतला तो पूर्णतः बरा होईपर्यंत बीसीसीआयच्या माध्यमातून सर्व प्रकारचे साहाय्य दिले जाणार आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी क्रिकेट नियामक मंडळ शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे. तो मंडळाशी करारबद्ध असणारा खेळाडू असल्याने त्याच्या उपचारांचे उत्तरदायित्व आणि त्याच्या उपचारांबंधीचे सर्वाधिकार बीसीसीआयचे आहेत. त्याच्यावर अद्याप चाचण्या सुरु असून त्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाद्वारे केल्या जात आहेत, अशीही माहिती देण्यात आली.









