रिषभ पंत…जितका प्रतिभावान तितकाच धडाकेबाज फलंदाज…खरं तर ‘टी-20’ला साजेसे गुण त्याच्या फलंदाजीत लपलेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताच्या कसोटी संघाचा अविभाज्य भाग बनलेल्या रिषभला मर्यादित षटकांच्या चमूतील स्थान पक्कं करता आलेलं नाहीये…या पार्श्वभूमीवर यंदाच्या ‘आयपीएल’चा त्यादृष्टीनं वापर करण्याची नामी संधी त्याच्यापुढं चालून आलीय. परंतु यावेळी त्याचा संघ बदललाय अन् लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व सांभाळताना सदोदित वजन पेलावे लागेल ते ‘सर्वांत महागड्या खेळाडू’च्या किताबाला साजेशी कामगिरी करण्याचं…त्यामुळं ‘इंडियन प्रीमियर लीग 2025’मध्ये पंतची कसोटी लागेल असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये…
‘इंडियन प्रीमियर लीग’ला प्रारंभ झालाय आणि क्रिकेट रसिकांना वेड लागायला सुद्धा…24 मार्च, 2025…विशाखापट्टणमचा एसीए-व्हीडीसीए स्टेडियम…तो फलंदाजीसाठी मैदानावर उतरला पाचव्या क्रमांकावर. पण कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसनं त्याचा झेल पकडला तेव्हा त्याला खातंही उघडणं शक्य झालं नव्हतं. पुन्हा एकदा त्यानं ‘व्हाईट बॉल क्रिकेट’मध्ये सर्वांची निराशा केली…‘आयपीएल’ला सुरुवात झाली तेव्हा सर्वांचं लक्ष त्याच्यावरच केंद्रीत झालं होतं अन् त्यामागचं एक कारण म्हणजे लखनौ सुपर जायंट्सनं (एलएसजी) त्याच्याशी केलेला ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या इतिहासातील सर्वांत मोठा असा चक्क 27 कोटी रुपयांचा करार..नाव : रिषभ पंत…‘एलएसजी’चा नवीन कर्णधार…
विशेष म्हणजे पंत आणि दुसऱ्या क्रमांकावरील महागडा फलंदाज श्रेयस अय्यर (26.75 कोटी रुपये) यांनी सिद्ध केलंय की, लिलावातील बोलीची रक्कम नि कारकीर्द यांचा काडीचाही संबंध नाहीये. अय्यरनं कोलकाता नाईट रायडर्सला 2024 सालचं ‘आयपीएल’ जेतेपद जिंकून दिल्यानंतरही त्याला भारताच्या ‘टी-20’ संघात स्थान मिळालं नव्हतं, तर रिषभ पंतला काही दिवसांपूर्वी संपलेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा यष्टीरक्षक बनून राहावं लागलं अन् एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. भारताच्या ‘टी-20’ संघात स्थान मिळविणं सुद्धा आता पूर्वीइतकं सोपं राहिलेलं नाहीये…
रिषभला नेहमीच भारतीय क्रिकेटचा ‘एक्स-फॅक्टर’ म्हणून ओळखलं गेलेलं असलं, तरी मर्यादित षटकांच्या सामन्यांत खेळताना त्याच्या कारकिर्दीनं अपेक्षेप्रमाणं झेप घेतलेली नाहीये. ‘आयसीसी चॅम्पियन्स’ चषक स्पर्धेत के. एल. राहुलनं त्याच्यावर मात केली, तर ‘टी-20’ लढतींत संजू सॅमसन आसनावर जाऊन बसलाय. रिषभ पंतला कसोटी सामन्यांत संधी मिळालेली असली, तरी तिथंही ऑस्ट्रेलियातील जलदगती गोलंदाजांचा जोरदार मुकाबला करावा लागला. भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी चॅम्पियन्स स्पर्धेपूर्वी पंत हाच पहिल्या क्रमांकाचा यष्टीरक्षक असेल असं विधान केलं होतं. परंतु प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्ट सांगितलं की, त्याला संधीसाठी वाट पाहावी लागेल…
या पार्श्वभूमीवर ‘इंडियन प्रीमियर लीग’ रिषभ पंतच्या कारकिर्दीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची ठरणार हे 100 टक्के निश्चित. लखनौ सुपर जायंट्सला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं व त्यामुळं पंतच्या डोक्यावरील दबाव खात्रीनं वाढलेला असेल…फलंदाजीतील अपयशाखेरीज त्या लढतीत त्याच्या अन्य चुकाही प्रकर्षानं जाणवल्या. त्यानं संघातील सर्वांत अनुभवी गोलंदाज शार्दुल ठाकूरनं पहिल्याच षटकांत दोन बळी घेऊनही त्याची दोन षटकं वाया घालविली, त्याच्या हाती पुन्हा चेंडू सोपविला नाही. शेवटच्या दोन षटकांत 22 धावा हव्या असताना निवड केली अननुभवी प्रिन्स यादवची, तर 20 व्या षटकाकरिता डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज अहमदची. हे कमी म्हणून की काय त्या अखेरच्या षटकात मोहित शर्माला यष्टिचीत करण्याची संधी दवडली…
नवीन संघ असल्यामुळं रिषभ पंतसमोरची आव्हानं देखील वेगळ्या प्रकारची…या पार्श्वभूमीवर दिल्लीनं विजयाचा हातचा घास हिरावून घेतल्यानंतर ‘एलएसजी’चे मालक संजीव गोएंका यांना लगेच त्याच्याशी संवाद साधण्यासाठी धाव घेण्यावाचून राहवलं नाही. त्यामुळं अनेकांना आठवण झाली ती गेल्या वर्षी गोएंका यांनी ‘एलएसजी’चा तत्कालीन कर्णधार के. एल. राहुलशी केलेल्या वर्तनाची. ते प्रकरण भलतंच गाजून त्याची परिणती झाली ती लखनौ व राहुलनं काडीमोड घेण्यात…नामवंत समालोचकांना वाटतंय की, रिषभनं आता ‘आयपीएल’मधील सर्वांत महागडा खेळाडू या बाबीकडे अजिबात लक्ष न देता खेळणं योग्य ठरेल…
कारण जर दिल्ली कॅपिटल्सनं पुन्हा त्याच्याशी करार केला असता, तर त्याला 27 कोटी इतकी प्रचंड रक्कम मिळालीच नसती. गरज आहे ती त्यानं शांत चित्तानं, अगदी विचारपूर्वक फलंदाजी करण्याची, जास्तीत जास्त धावा नोंदवून निवड समितीच्या सदस्यांना प्रभावित करण्याची. खुद्द रिषभ पंतनं म्हटलंय की, त्यानं नेहमीच प्रथम विचार केलाय तो भारतीय संघाचा, ‘आयपीएल’चा नव्हे…‘मला अपघात झाला तेव्हा मी ‘आयपीएल’चा विचारही केला नव्हता. माझं सारं लक्ष होतं ते भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविण्यावर’, त्याचे शब्द…अनेक विश्लेषकांच्या मतानुसार, राहुलनं एकदिवसीय सामन्यांत यष्टीरक्षक म्हणून त्याचं स्थान भक्कम बनविलेलं असलं, तरी पंत त्याच्यापासून फारसा दूर नाही. पण कर्नाटकाच्या फलंदाजाचं कौतुक करावंच लागेल. कारण त्यानं रिषभ पंतसारख्या दर्जाच्या खेळाडूला अगदी आरामात मागं टाकलंय…
‘आयपीएल’चं उदाहरण घेतल्यास असं दिसेल की, भारताचे प्रशिक्षक गंभीर यांचा विश्वास आहे तो प्रत्येकाला योग्य संधी देण्यावर आणि फारसे बदल न करण्यावर. रिषभ जखमी असताना भारतातील विश्वचषक लढतीत छान कामगिरी केलेल्या राहुलला त्यामुळंच खेळता आलंय अन् पंतला सुद्धा योग्य वेळी संधी मिळेल…अनेकांना वाटतंय की, रिषभ पंतला ‘व्हाईट बॉल क्रिकेट’मध्ये अपेक्षेप्रमाणं झेप घेणं शक्य झालेलं नाही ते त्याला त्याची भूमिकाच माहीत नसल्यानं. जबरदस्त अपघात होण्यापूर्वी 2022 मधील एकदिवसीय सामन्यांत प्रशिक्षक राहुल द्रविडकडून त्याला चौथ्या क्रमांकावर पाठविलं जायचं. इंग्लंडविरुद्धची मालिका तर त्याच्या नाबाद शतकानंच भारताला जिंकून दिली होती. 2022 सालच्या ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी वेळ न गमावता ‘टी-20’ लढतींत त्याला सलामीवीर बनविलं, तर 2024 मध्ये भारतानं जिंकलेल्या ‘टी-20’ विश्वकरंडक स्पर्धेत त्यानं फलंदाजी केली ती तिसऱ्या क्रमांकावर…
येऊ घातलेल्या काळाचा विचार केल्यास 2026 सालच्या सुरुवातीला ‘टी-20’ विश्वचषक रंगेल, तर 2027 च्या उत्तरार्धात एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा…भारताच्या निवड समितीला कसोटी सामन्यांच्या बाबतीत रिषभ पंतला पर्याय नाही असंच वाटतंय. त्यामुळं देखील त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यांत योग्य प्रकारे संधी मिळालेली नाहीये. कदाचित यंदा ‘टी-20’मध्ये त्याला ती मिळेल…समालोचन करणाऱ्या निवड समितीच्या एका माजी सदस्याच्या मते, पंतची ताकद लपलीय ती जास्तीत जास्त षटकं फलंदाजी करण्यात आणि ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये खेळताना त्यानं त्याच पद्धतीचा अवलंब करायला हवा. त्यानं डावाचा प्रारंभ केल्यास देखील ते योग्य ठरेल. जेव्हा 19 वर्षांच्या रिषभ पंतची भारतीय संघात प्रथम निवड करण्यात आली तेव्हा तो जलदगती नि फिरकी गोलंदाजांना अगदी सहज खेळायचा. त्यानं आता त्या कलेला जास्तीत जास्त न्याय द्यायला हवा…
रिषभ पंतनं ‘टी-20’ लढतींतला ‘फिनिशर’ बनण्याचा प्रयत्न न केलेलाच बरा असं वाटणारे देखील अनेक विश्लेषक आढळतील. साऱ्या क्रिकेट विश्वाला पंत माहीत आहे तो पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर येणारा एक दर्जेदार फलंदाज म्हणून. त्यानं आता सिद्ध करायला हवंय की, वरच्या क्रमांकावर खेळण्याची ताकद त्याच्या अंगात लपलीय. ‘एलएसजी’साठी सलामीचा वा तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणूनच तो योग्य भूमिका बजावू शकेल…
संजीव गोएंका ज्यावेळी रिषभ पंतच्या भेटीस गेल्याचं पडद्यावर झळकलं तेव्हा समालोचकांच्या कक्षात होते ते सुनील गावस्कर. त्यांनी नंतर काय म्हटलं ते नजरेखालून घालण्यासारखं…‘मला वाटतं आपण कुठं चुकलोय हे त्याला चांगलंच माहीतंय. त्यानं सामन्यानंतरच्या मुलाखतीत सुद्धा म्हटलं की, तुम्ही तुमच्या यशापेक्षा चुकांमधून जास्त शिकता. जेव्हा तुम्ही चांगली फलंदाजी करता तेव्हा विचार करण्यासारखं फारसं काही नसतं. पण जेव्हा तुम्ही फलंदाजी किंवा गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करत नाही तेव्हा तुम्हाला सुधारणा आवश्यक असलेल्या क्षेत्रांची जाणीव होते. हा पंतचा पहिलाच सामना आणि अजून 13 बाकी आहेत. तो एक बुद्धिमान क्रिकेटपटू आहे आणि त्यानं फलंदाजी नि कर्णधारपदाबद्दल मोलाचे धडे घेतलेले असतीलच. त्यानं त्याच्या कामगिरीत सुधारणा घडविल्याचं लवकरच आम्हाला पाहायला मिळेल’…गावस्कर यांचे हे बोल खरे ठरोत अशी इच्छा लखनौ सुपर जायंट्स व रिषभ पंतच्याच नव्हे, तर ‘आयपीएल’च्या प्रत्येक चाहत्याची असेल !
– राजू प्रभू









