वृत्तसंस्था/ लीड्स, इंग्लंड
भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला पंचांच्या निर्णयावर नापसंती दर्शविल्याबद्दल आयसीसीने ताकीद दिली आहे. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हा प्रकार घडला होता.
या कसोटीच्या दोन्ही डावात शतके नोंदवत पंतने शानदार प्रदर्शन केले. मात्र इंग्लंडच्या पहिल्या डावावेळी त्याच्या वर्तनाबद्दल त्याला समज देण्यात आली आहे. त्याच्याकडून आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल 1 चा गुन्हा घडला आहे. त्याने आर्टिकल 2.8 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले. खेळाडू, साहाय्यक स्टाफ किंवा पंचांच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केल्यास या कलमानुसार कारवाई करण्यात येते. याशिवाय शिस्तभंगाबद्दल त्याच्यावर एक डिमेरिट गुणही त्याच्या खात्यावर जमा झाला आहे. गेल्या 24 महिन्यात त्याच्याकडून घडलेला हा पहिलाच गुन्हा आहे.
61 व्या षटकावेळी ब्रूक व स्टोक्स फलंदाजी करीत असताना चेंडूच्या आकाराबद्दल पंत पंचांशी चर्चा करीत असल्याचे दिसून आले. निरीक्षणानंतर पंचांनी चेंडू योग्य असल्याचे सांगून तो बदलण्यास नकार दिल्यानंतर त्या निर्णयावर पंचांसमोरच पंतने चेंडू रागाने मैदानावर आपटून नाराजी व्यक्त केली होती.









