वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इंग्लंडच्या दौऱ्यावर जखमी झालेला रिषभ पंत आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याची द.आफ्रिका अ संघाबरोबर होणाऱ्या मालिकेसाठी भारत अ संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
द. आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. तत्पूर्वी भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यात चार दिवसांचे दोन सामने आयोजित केले असून पहिला सामना 30 ऑक्टोबरपासून बेंगळूर येथे सुरू होईल. चार दिवसांचे हे दोन्ही सामने बेंगळूरमध्येच खेळविले जातील. रिषभ पंत गेल्या जुलै महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यात मँचेस्टरच्या चौथ्या कसोटीत खेळताना जखमी झाला होता. त्याच्या तळव्याचे हाड मोडल्याने तो आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत तसेच अलिकडेच झालेल्या विंडीजविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेत खेळू शकला नाही. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला असल्याने निवड समितीने त्याची भारत अ संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे. द.आफ्रिकेचा संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. त्यामुळे पंतला द.आफ्रिका अ बरोबरच्या मालिकेत दर्जेदार कामगिरी करावी लागेल. भारत आणि द.आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून कोलकत्ता येथे सुरू होईल. या कसोटी मालिकेनंतर भारत आणि द. आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.
चार दिवसांच्या पहिल्या सामन्यासाठी भारत अ संघामध्ये के. एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडीक्कल, ध्रुव जुरेल, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे. साई सुदर्शनकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात या सहा खेळाडूंचा समावेश होता. प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि ध्रुव जुरेल या चार खेळाडूंचा 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या चार दिवसांच्या दुसऱ्या सामन्यासाठी भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे. आकाश दीपने इंग्लंड दौऱ्यानंतर एकही कसोटी सामना खेळलेला नाही. द.आफ्रिका अ संघाचे नेतृत्व मार्क्वेस अॅकरमनकडे सोपविण्यात आले आहे.
भारत अ संघ (पहिल्या सामन्यासाठी) : रिषभ पंत (कर्णधार), आयुष म्हात्रे, जगदीशन, साई सुदर्शन, पडीक्कल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुष कोटीयन, मानव सुतार, अन्शुल कंबोज, यश ठाकुर, बदोनी आणि सारांश जैन.
भारत अ संघ (दुसऱ्या सामन्यासाठी) : रिषभ पंत (कर्णधार), के. एल. राहुल, ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटीयन, मानव सुतार, खलील अहमद, जी. ब्रार, अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज व आकाश दीप.









