वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीसीसीआयने मंगळवारी रिषभ पंतला आगामी आयपीएलमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित केले आहे. 14 महिन्यांपूर्वी एका भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यातून सावरलेला पंत यामुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेवेळी राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता वाढली आहे.
पंत पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून परत येणार आहे. तो व्यापक पुनर्वसन प्रक्रियेत सहभागी होऊन पूर्णपणे सावरला आहे आणि लीगमधील त्याच्या नेमक्या भूमिकेबद्दलच्या अटकळांना समाप्त करून तो 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत दुहेरी जबाबदारी पेलण्यास सिद्ध झाला आहे.
30 डिसेंबर, 2022 रोजी उत्तराखंडमध्ये रुरकीजवळ झालेल्या रस्त्यावरील जीवघेण्या अपघातानंतर 14 महिन्यांच्या व्यापक पुनर्वसन आणि सावरण्याच्या प्रक्रियेतून गेलेल्या रिषभ पंतला आगामी आयपीएलमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळण्याच्या दृष्टीने तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे, असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे. ‘आयपीएल’नंतर जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.
खेळण्यास परतण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व फिटनेस चाचण्यांत उत्तीर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने आठवडाभरापूर्वी पंतला तंदुऊस्त घोषित केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ‘एनसीए’ने प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याच्या दृष्टीने तयारीकरिता आयोजित केलेल्या उपक्रमावेळी त्याने बराच काळ फलंदाजी केली आणि महत्त्वाचे म्हणजे यष्टिरक्षणही केले. ‘आयपीएल’मध्ये तो फक्त ‘इम्पॅक्ट प्लेअर’ किंवा निव्वळ फलंदाज म्हणून खेळू शकेल अशी अटकळ होती. पण गेल्या सहा वर्षांतील भारताच्या सर्वांत मोठ्या मॅचविनर्सपैकी एक राहिलेला रिषभ पंत पूर्ण जोमाने खेळण्यासाठी वेळीच तंदुरुस्त होण्यात यशस्वी झाला आहे. तो यष्टिरक्षण करू शकेल याचा अर्थ असा आहे की, जर तो आयपीएल हंगामात काही प्रभावी खेळी करू शकला, तर त्याला ‘टी20 विश्वचषक स्पर्धे’त खेळण्याची चांगली संधी आहे.
शमी सप्टेंबरपूर्वी परतणार नाही
दरम्यान, मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स) गेल्या महिन्यातील टाचेवरील शस्त्रक्रियेमुळे आयपीएलमध्ये भाग घेऊ शकणार नसून तो या वर्षी सप्टेंबरपूर्वी परतण्याची अपेक्षा नाही. 26 फेब्रुवारी रोजी त्याच्या उजव्या टाचेवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे आणि आगामी ‘आयपीएल’मधून त्याला बाहेर ठेवण्यात आले आहे, असे बीसीसीआयच्या निवेदनात म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेत कसोटी पदार्पण केलेला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (राजस्थान रॉयल्स) याच्यावरही शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या त्याच्यावर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून देखरेख ठेवली जात आहे आणि लवकरच तो एनसीएमध्ये पुनर्वसन प्रक्रिया सुरू करेल. आगामी ‘आयपीएल’मध्ये तो भाग घेऊ शकणार नाही, असे बीसीसीआयने म्हटले आहे.









