मिश्र रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्य : ट्रॅक सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला तीन पदके
क्रीडा प्रतिनिधी/ पणजी
महाराष्ट्राच्या ऋषभ दासने पुरुषांच्या 50 मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्वत:ची रूपेरी हॅट्ट्रिक पूर्ण केली. याचप्रमाणे मिश्र रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळाले. जलतरणात महाराष्ट्राने शुक्रवारी तीन रौप्यपदके कमावली. ऋषभने ही शर्यत 26.66 सेकंदांत पार केली. कर्नाटक संघाचा श्रीहरी नटराजने (25.77 सेकंद) सुवर्णपदक जिंकले. ऋषभने याआधी या स्पर्धेत 100 मीटर्स बॅकस्ट्रोक व 200 मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. ऋषभ हा ठाणे येथे ज्येष्ठ प्रशिक्षक गोकुळ कामत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
महाराष्ट्र संघाने चार बाय 100 मीटर्स मिश्र रिले शर्यतीत रौप्यपदक पटकावले. मित मखिजा, अवंतिका चव्हाण, ऋजुता खाडे व वीरधवल खाडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने ही शर्यत 3 मिनिटे, 42.61 सेकंदांत पार केली. कर्नाटक संघाने हेच अंतर 3 मिनिटे, 38.24 सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले.
डायव्हिंगमध्ये ऋतिका श्रीरामची पदकांची हॅट्ट्रिक
महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील डायव्हिंगमध्ये एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात रौप्यपदक जिंकताना पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तिने 151 गुण नोंदवले. या स्पर्धेमध्ये तिने या अगोदर एक रौप्य व एक कांस्यपदक जिंकले होते. ऋतिका ही सोलापूरची खेळाडू असून तिचे पती हरिप्रसाद हेदेखील आंतरराष्ट्रीय डायव्हिंगपटू आहेत.
वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र पुरूष संघ 26 वर्षांनी अंतिम फेरीत
महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगाल संघावर 16-4 असा दणदणीत विजय नोंदवला आणि वॉटरपोलोमधील पुरुष गटात अंतिम फेरी गाठली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तब्बल 26 वर्षांनी महाराष्ट्र संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाला मात्र उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना आता कांस्यपदकासाठी खेळावे लागणार आहे. महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राला केरळ संघाने 16-7 असे सहज पराभूत केले. शनिवारी सकाळी होणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्राची कर्नाटक संघाची गाठ पडणार आहे. त्यानंतर पुरुष गटाचा अंतिम सामना होणार आहे.
ट्रॅक सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला एका सुवर्णासह दोन पदके
मयुरी लुटेच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील ट्रॅक सायकलिंग क्रीडा प्रकारात शुक्रवारी एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली. मयुरीने वैयक्तिक सुवर्णपदकासह हॅट्ट्रिक साजरी केली.
नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील वेरणा-बिर्ला बायपास एअरपोर्ट रोडवर चालू असलेल्या या स्पर्धेमधील 1000 मीटर स्प्रिंट शर्यतीमध्ये महाराष्ट्राच्या मयुरीने सुवर्णपदक आणि श्वेता गुंजाळने कांस्यपदक मिळवण्याची किमया साधली. दिल्लीच्या त्रियशा पॉल हिला रौप्यपदक मिळाले. 3000 मीटर सांघिक परसूट प्रकारात महाराष्ट्राच्या महिला संघाने रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या संघात मयुरीसह सुशिकला आगाशे, वैष्णवी गभने, शिया लालवाणी आणि पूजा दानोळे यांचा समावेश होता. या शर्यतीत मणिपूरच्या संघाला सुवर्णपदक आणि हरयाणाच्या संघाला कांस्य पदक मिळाले. महाराष्ट्राने ट्रॅक सायकलिंगमध्ये आतापर्यंत चार पदके मिळवली असून, मयुरीने गुरुवारी 500 मीटर टाइम ट्रायलमध्ये कांस्यपदक पटकावले होते.









