क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए फोर्थ झोन क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आरआयएस संघाने मुंडगोड क्रिकेट अकादमीचा 117 धावांनी पराभव करून केएससीए चषक फोर्थ डिव्हिजन चषक पटकाविला. सात गडी बाद करणाऱ्या व्हिन्सेटला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
हुबळी येथील केएससीए क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात आरआयएस संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 9 गडी बाद 211 धावा केल्या. त्यात रोहित आदिमनीने 8 चौकारासह 46, मयुरने 4 चौकारासह 35, स्वप्नील, मंजुनाथ 15 व शीतल यांनी प्रत्येकी 12 तर भरत, हरीकुमार यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. मुंडगोड अकादमीतर्फे अनिल कोरवरने 34 धावात 3, शिवाराजने 58 धावात 3, तर रवीने एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंडगोड क्रिकेट अकादमीचा डाव 19.5 षटकात सर्व बाद 95 धावात आटोपला. त्यात पवनने 2 षटकार, एक चौकारासह 28, अनिल कोपरानीने 2 चौकारासह 29, रवीन 2 चौकारासह 15 धावा केल्या. आरआयएसतर्फे व्हिन्सेटने भेदक गोलंदाजी करत 10 धावात 7 गडी बाद करीत निम्याहून अधिक संघ गारद केला. त्याला स्वप्नील व रोहित यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून सुरेख साथ दिली. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आरआयएस व उपविजेत्या मुंडगोड क्रिकेट अकादमीचा गौरव करण्यात आला.









