वृत्तसंस्था / बडोदा
सोशल मिडियावर प्रसारित करण्यात आलेल्या एका बनावट पोस्टमुळे गुजरातमधील महत्वाचे शहर असणाऱ्या बडोदा शहराच्या एका भागात धार्मिक दंगल उसळली आहे. हा बनावट व्हिडीओ कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनविण्यात आल्याचे नंतर तपासात स्पष्ट झाले. या व्हिडीओत एका मुस्लीम प्रार्थनास्थळावर हल्ला केला जात असल्याचे दृष्य दाखविण्यात आले आहे. त्यामुळे काही संतप्त मुस्लीम तरुणांनी शहराच्या जुनीगढी भागात दंगल केल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी 50 जणांना ताब्यात घेतले आहे.
साधारणत: दोन तास चाललेल्या या दंगलीत अनेक घरे आणि दुकाने यांची हानी करण्यात आली. काही स्थानी आगी लावण्यात आल्या. तर अनेक वाहनांची मोडतोड करण्यात आली. पोलिसांनी लाठीहल्ला करुन आणि अश्रूधुराचा उपयोग करुन स्थिती नियंत्रणात आणली. बनावट व्हिडीओ प्रसारित करण्याचा हा प्रकार हेतुपुरस्सर करण्यात आला होता काय याची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, मुस्लीम प्रार्थना स्थळावर हल्ला करण्याचा कोणताही प्रसंग घडलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा दंगली घडविण्याच्या व्यापक कारस्थानाचा भाग असावा, असा पोलिसांचा संशय आहे. त्या दिशेने तपास करण्यात येत आहे.









