ऑनलाईन टीम / तरुण भारत :
इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त पोस्टमुळे अकोल्यात शनिवारी रात्री दोन गटात दंगल उसळली. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक करत वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. यात एकाचा मृत्यू झाला असून, 17 जण जखमी आहेत. दंगलीतील 30 जणांना अटक करण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू केले आहे.
इन्स्टाग्रामवर एका तरुणाने वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्टनंतर अकोल्यातील जुना शहर भागातील हरिपेठमध्ये दोन समुदाय रस्त्यावर उतरले. त्यांच्यात संबंधित पोस्टवरुन किरकोळ वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले आणि त्यानंतर दंगल उसळली. दोन्ही गटाने जोरदार दगडफेक करत शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. अनेक वाहनांची तोडफोड करत वाहने पेटविण्यात आली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 17 जण जखमी आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 30 जणांना पोलिसांनी अटक केली असून, शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. शहरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.









