ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक प्रचारक पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकतो. पण त्यावर भाजप एसआयटी नेमत नाही. रामनवमीनंतर दंगल झाली तेव्हा एसआयटी नेमली गेली नाही, मग त्र्यंबकेश्वर घटनेवर एसआयटी कसली नेमताय? असा सवाल उपस्थित करत कुरुलकर प्रकरणावरुन लक्ष हटविण्यासाठी दंगली घडवल्या जात असल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे.
नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यासह हवाई दलाचा अधिकारी पाकिस्तानी हनी ट्रॅपमध्ये अडकला आहे. हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. पण त्याच्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी त्र्यंबकेश्वर, शेवगाव, अकोल्यात दंगली घडवल्या जात आहेत. पण महाराष्ट्र एकसंघ आहे, एकसंघ राहिल. तुम्ही दंगली घडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ.
दरम्यान, महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा योजनाबद्ध पद्धतीने बिघडवण्याचे खेळ सुरु आहेत. जनतेचा पाठिंबा नसल्याने सरकार दंगली घडवत आहे. महाराष्ट्रात पुन्हा हिंदुत्त्वाच्या नावाने टोळय़ा निर्माण करुन वातावरण बिघडवण्याचा कट दिसत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात कोणीही घुसल्याची माहिती माझ्याकडे नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशाप्रकारचं पत्र लिहायला सांगितलं, असाही आरोप त्यांनी केला.








