मंडोळीच्या शेतकऱ्यांनी मांडले गाऱ्हाणे
बेळगाव : शहराला लागूनच रिंगरोड करण्यासाठी 2006-07 साली बुडाने जमीन घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो प्रस्ताव पूर्णपणे बारगळला होता. असे असताना रिंगरोडसाठी मंडोळी येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनींवर बुडाचे नाव नोंद केले. त्याविरोधात प्रांताधिकाऱ्यांकडे खटला दाखल केला असता प्रांताधिकाऱ्यांनी बुडाच्या बाजूनेच निकाल दिला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन खुलाशाची मागणी केली. सदर रिंगरोड हा पूर्णपणे स्थगित केला आहे. मात्र अजूनही काही शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर रिंगरोडसाठी जमीन घेण्यासाठी बुडाचे नाव नमूद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मंडोळी येथील सर्व्हे क्रमांक 60/8 आणि 61/1 या जमिनीवर बुडाचे नाव आहे. सदर जमीन शेतकऱ्यांच्या कब्जात आहे. मात्र उताऱ्यावर बुडाचे नाव असल्याने शेतकऱ्यांना नेमके काय करायचे? असा प्रश्न पडला आहे. शहरानजीकचा रिंगरोड स्थगित झाला आहे.
असे असताना केवळ दोनच शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर याचा उल्लेख कसा झाला? असा प्रश्नही उपस्थित होतो. त्या दोन सर्व्हे क्रमांकांमध्येच रिंगरोड करणार का? असा हास्यास्पद प्रश्नही उपस्थित होत आहे. प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी शेतकऱ्यांचे वकील बाळकृष्ण कांबळे यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र तुम्ही आता बुडाकडेच पाठपुरावा करा, असे सांगितले. रिंगरोड होण्याबाबत कोणत्याच हालचाली नाहीत. मात्र शेतकऱ्यांच्या उताऱ्यांवर बुडाचे नाव दाखल आहे. वास्तविक हे खटले तेव्हाच निकालात काढून पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांची नावे दाखल करण्यासाठी बुडा व प्रांताधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप आता होत आहे. सदर खटला शेतकऱ्यांच्या विरोधात गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागणार आहे.









