499 एकर जमिनीसंदर्भात 16 गावांच्या नावांचा नोटिफिकेशनमध्ये उल्लेख
प्रतिनिधी/ बेळगाव
रिंगरोड करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंबर कसली आहे. यापूर्वी नोटिफिकेशन दिल्यानंतर आता थ्रीडी नोटिफिकेशन दिले आहे. पहिल्या नोटिफिकेशनमध्ये केवळ 16 गावांचा उल्लेख आहे. त्यामुळे तीन टप्प्यांमध्ये या रिंगरोडचे काम करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच लढा लढण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
रिंगरोड करण्यासाठी तालुक्यातील 32 गावांमधील जमीन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. मागीलवेळी नोटिफिकेशन दिल्यानंतर त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याठिकाणी न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर पुन्हा नोटिफिकेशन देऊन शेतकऱ्यांकडून हरकती दाखल करून घेतल्या. तालुक्यातील सर्वच गावांतील शेतकऱ्यांनी रिंगरोडला जमीन देणार नाही, असे म्हणणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडले होते. मात्र, ते म्हणणे फेटाळून लावले असून आता शुक्रवारी पुन्हा थ्रीडी नोटिफिकेशन दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार, हे निश्चित आहे.
सध्या देण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये 16 गावांच्या नावांचा उल्लेख आहे. एकूण 499 एकर जमिनीसंदर्भात ही नोटिफिकेशन दिली आहे. अजून 700 एकर जमिनीबाबत नोटिफिकेशन देण्यात आलेले नाही. त्यामुळे आणखी दोन टप्प्यांमध्ये नोटिफिकेशन प्रसिद्ध होण्याची शक्यता वकिलांनी व्यक्त केली आहे. या नोटिफिकेशनमुळे आता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. तीन टप्प्यांमध्ये हे काम करण्याचा प्रयत्न होणार आहे. यासाठी टेंडरदेखील मागविण्यात आले आहेत, असे अॅड. एम. जी. पाटील यांनी सांगितले. सरकारपेक्षाही आता कंत्राटदारच या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









