संतिबस्तवाड, वाघवडे परिसरातील शेतकरी संतप्त : उभारलेले पोल काढण्यास पाडले भाग
बेळगाव : रिंगरोड करण्यासाठी नोटिफिकेशन देण्यात आली. शेतकऱ्यांकडून तक्रारी मागविण्यात आल्या. शेतकरी आपल्या तक्रारी दाखल करीत आहेत. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. असे असताना अचानकपणे या रस्त्याचा सर्व्हे करण्यासाठी कर्मचारी पाठविण्यात आले. संतिबस्तवाड, वाघवडे परिसरात पोल लावले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आणि ते पोल काढून टाकण्यास भाग पाडले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बेळगावच्या प्रांताधिकाऱ्यांच्या नावे नोटिफिकेशन दिले. शेतकऱ्यांना आपल्या हरकती दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे तालुक्यातील 32 गावांतील शेतकऱ्यांनी त्याला विरोध दर्शविला. शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देऊ शकणार नाही, असे स्पष्ट केले. तरीदेखील अचानकपणे या रिंगरोडचा सर्व्हे करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा प्रकार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अॅड. प्रसाद सडेकर यांनी या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आम्ही अजूनही म्हणणे मांडणे बाकी असताना तुम्ही सर्व्हे का करता? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला केवळ सूचना करण्यात आल्या आहेत. आम्ही पोटासाठी काम करीत आहे. आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा आम्हाला माफ करा, अशी विनवणी त्या कर्मचाऱ्यांनी केली. वकील व शेतकऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांना पोल काढण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी पोल काढले व तेथून काढतापाय घेतला. यापूर्वी विविध गावांमध्ये जाऊन अशाप्रकारे सर्व्हे करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यालादेखील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बेकायदेशीर सर्व्हे करण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.









