संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पाठविले परत : रिंगरोडसाठी सुपीक जमीन न देण्याचा ठाम निर्धार
वार्ताहर /कडोली
नियोजित रिंगरोडच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची अडवणूक करून त्यांना कडोली येथील संतप्त शेतकऱ्यांनी परत पाठविले. तर गुंजेनहट्टी आणि देवगिरी येथे सर्व्हेचे काम करून झाल्यानंतर नोटिसा पाठविल्याचा प्रकार घडल्याने तेथील शेतकरी वर्गात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कडोली भागातील सुपीक जमिनीतून रिंगरोड करण्याचा डाव आखला गेला आहे. याला प्रथमपासूनच शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. भात उत्पादनात राज्यस्तरीय बक्षिसे ज्या जमिनीतून घेतली गेली. शिवाय वर्षातून तीनवेळा पीक उत्पादन घेतले जाते अशा जमिनी आम्ही कदापीही देणार नाही. अशी भूमिका असताना संबंधित सर्व्हे अधिकारी सर्व्हेसाठी कडोली शिवारात बुधवारी आले असताना संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून रिंगरोडसाठी सुपीक जमिनी देणार नाही, असे ठासून सांगितले आणि त्यांना परत पाठविले. यावेळी अॅड. श्याम पाटील, जि. पं. माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे, ग्रा. पं. सदस्य राजू मायाण्णा, सुनिल पावणोजी, दत्ता सुतार, सुधीर जाधव, प्रकाश राजाई, शिवाजी कुट्रे, सूर्याजी कुट्रे, दस्तगीर पठाण, अॅड. कमलेश मायाण्णाचे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
गुंजेनहट्टी-देवगिरी शिवारातही सर्व्हे
गुंजेनहट्टी आणि देवगिरी येथील शिवारात संबंधित अधिकाऱ्यांनी जमिनीचे सर्व्हे केल्याची माहिती प्राप्त झाली असून सर्व्हे झाल्यानंतर शेतकऱ्यांना नोटिसा धाडण्याचा प्रकार घडल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शासनाने सर्व्हे केले तरी आम्ही आमची शेती रिंगरोडसाठी देणार नाही, अशी ठाम भूमिका तेथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.









