जिल्हाधिकारी कार्यालयात बॅलेट पेपरद्वारे मतदानाची सोय : सायंकाळी उशिरापर्यंत प्रक्रिया
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघ व चिकोडी लोकसभा मतदारसंघात सेवेत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बॅलेट पेपर मतदानाची प्रक्रिया गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्याप्रमाणे इतर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना बेळगाव जिल्ह्यात नेमणूक करण्यात आली आहे. याबरोबरच इतर जिल्ह्यात मतदान असणारे पोलीस कर्मचारी सेवा बजावत आहेत. अशा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बॅलेट पेपर मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार बेळगाव, चिकोडी व कारवार लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खानापूर भागातील पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानासाठी वेळ देण्यात आली होती. यादरम्यान राखीव पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीसप्रमुखांच्या व्याप्तीत येणाऱ्या पोलिसांनी मतदान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत वेळेनुसार पोलिसांनी मतदानाचा हक्क बजावला.









