प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये आणखी एक राजकीय पक्ष उदयास येत आहे. जनसुराज अभियान 2 ऑक्टोबर रोजी पक्षाचे रुप धारण करणार आहे. याचदरम्यान जन सुराजचे सूत्रधार प्रशांत किशोर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जन सुराज हा देशातील पहिला पक्ष ठरणार आहे, जो स्वत:च्या घटनेत ‘राइट टू रिकॉल’ म्हणजेच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलाविण्याची तरतूद जोडणार आहे. जन सुराजकडून बुधवारी यासंबंधी वक्तव्य जारी करण्यात आले आहे.
पक्ष स्थापन करण्यापूर्वी प्रशांत किशोर हे स्वत:ची पदयात्रा आणि विविध बैठकांच्या माध्यमातून जनतेसमोर जन सुराज पक्षाच्या रुपरेषेवर चर्चा करत आहेत. जन सुराज कुठल्याही प्रकारे अन्य राजकीय पक्षांपेक्षा वेगळा असेल आणि चांगला पर्याय ठरणार असल्याचे प्रशांत किशोर हे लोकांना समजावून सांगत आहेत. मतदार स्वत: निवडलेल्या लोकप्रतिनिधीला अडीच वर्षांच्या कालावधीनंतर हटविण्याचा अधिकार बाळगून असतील असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे.
जन सुराजच्या तिकिटावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने लोकांच्या अपेक्षांची पूर्तता न केल्यास जनता त्याच्या विरोधात अविश्वास ठराव संमत करू शकते. याचय अंतर्गत एका निश्चित टक्केवारीतील मतदार स्वत:च्या प्रतिनिधीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणत असतील तर पक्ष संबंधित प्रतिनिधीला राजीनामा देण्यास भाग पाडणार असल्याचा दावा प्रशांत यांनी केला आहे.









