वार्ताहर /नंदगड
खानापूर रवळनाथ मंदिरात आयोजित ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त बुधवारी माउलींच्या अश्वांचा रिंगण सोहळा पार पडला. खानापूर शहरासह तालुक्यातील हजारो भाविक रिंगणसोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. शहरातील स्टेशनरोड या मुख्य रस्त्यावर उभे रिंगण तर जांबोटी क्रॉसजवळील मलप्रभा क्रीडांगणावर गोल रिंगण झाले. ज्ञानेश्वर मंदिरापासून स्टेशनरस्ता मार्गे शिवस्मारक ते मलप्रभा क्रीडांगणापर्यंत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात महिलांसह नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. विठुनामाचा गजर सर्वत्र घुमत होता. त्यामुळे खानापूर शहराला पंढरीचे स्वरुप प्राप्त झाले होते. सालाबादप्रमाणे शुक्रवार दि. 6 पासून बुधवार दि. 11 पर्यंत ज्ञानेश्वर मंदिर आवारात ज्ञानेश्वरी पारायण झाले. भजन, नामस्मरणाबरोबरच नामवंत प्रवचनकार व कीर्तनकारांची कीर्तने झाली. गुरुवार दि. 12 रोजी सकाळी कालाकीर्तन, त्यानंतर रवळनाथ मंदिराभोवती दिंडी व दुपारी 1 वाजता महाप्रसाद होऊन पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे.









