दोडक्याची भाजी करताना दोडक्याच्या काढलेल्या शिरांना नेहमीच फेकून देण्यात येत . पण याच शिरा वापरून आपण खूप चवीष्ट चटणी बनवू शकतो. दोडक्याची भाजी आवडत नसणाऱ्यांना दोडक्याची खमंग, क्रिस्पी चटणी नक्कीच आवडेल. शिवाय त्यामध्ये प्रोटिन्स, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स देखील दोडक्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात.चला तर मग याची रेसिपी जाणून घेऊयात.
साहित्य
दोडक्याची साले, तेल, मीठ, मोहरी, हिंग, हळद, तिखट आणि तीळ.
कृती
दोडक्याची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी दोडके सोलून घ्या. दोडक्याच्या साली पाण्यात टाकून व्यवस्थित धुवून घ्या. आता एखादा तवा किंवा कढई गॅसवर ठेवा.तवा चांगला तापला की त्यावर तेल टाका. तेल गरम झाल्यावर मोहरी टाका.मोहरी तडतडली की त्यामध्ये चिमुटभर हळद आणि तेवढाच हिंग टाका.यानंतर एक टेबलस्पून तीळ टाकावेत.तीळ फुलून आले की लगेचच त्यामध्ये दोडक्याच्या साली टाकाव्यात आणि चांगल्या परतून घ्याव्या. साली अर्धवट परतून झाल्या की त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट टाकावे.जेव्हा दोडक्याची साले लालसर होऊ लागतीत आणि कुरकुरीत होत जातील, तेव्हा ती व्यवस्थित परतल्या गेली आहेत असे समजावे आणि गॅस बंद करावा.गॅस बंद केला तरी काही वेळ चटणी तशीच तापलेल्या तव्यावर राहू द्यावी. यामुळे सालांचा कुरकुरीतपणा आणखी वाढतो आणि चटणी खूपच खमंग लागते.