मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती : ग्राहकांना दिलेली विश्वासार्ह सेवा हाच यशाचा पाया
बेळगाव : बेळगावची पहिली केबल नेटवर्क कंपनी आणि जनतेचे प्रेम व विश्वासाने यशाच्या शिखरावर पोहोचलेली रिद्धी व्हिजन अर्थात मेट्रोकास्ट प्रायव्हेट इंडिया लिमिटेड, जीटीपीएलचा 30 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. रिद्धी व्हिजन अर्थात मेट्रोकास्ट प्रायव्हेट इंडिया लिमिटेड, जीटीपीएलचे संचालक नागेश छाब्रिया आणि एमडी अनिरुद्धसिंह जडेजा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उत्तरचे आमदार राजू सेठ, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दिवंगत निशा छाब्रिया यांनी लोकांशी साधलेला संवाद उपस्थितांची मने जिंकून गेला. खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, या व्यवसायात नागेश छाब्रिया आणि हरिश गुलबानी यांनी विश्वास दाखवला. हा केवळ व्यवसाय नसून, नेटवर्क तयार करण्याचे उत्तम माध्यम असल्याचे समजले. नागेश छाब्रिया यांनी सुरू केलेला हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे.
महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, रिद्धी व्हिजनच्या संचालिका निशा छाब्रिया यांनी पाहिलेले स्वप्न त्यांची मुले पूर्ण करत आहेत. संस्था सुरू करण्यासाठी मोठी स्वप्ने पाहिली जातात. अनेक चढ-उतारानंतर मिळविलेले यश पाहून समाधान वाटते. केबल नेटवर्कमध्ये किंग असलेल्या जडेजा यांच्यासोबत बेळगावचे उद्योजक छाब्रिया काम करत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, रिद्धी व्हिजनला एक परिवार मानून सेवा केल्यामुळेच संस्थेला यश मिळाले आहे. निशा आणि नागेश छाब्रिया सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी संस्था वाढवण्यासोबतच अनेकांच्या जीवनाला आधार दिला आहे. बेळगावात त्यांनी केलेल्या कामाचा अभिमान वाटतो. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ म्हणाले की, छाब्रिया कुटुंबासोबत आमचे नाते जुने आहे. नागेश छाब्रिया इतक्या उच्च स्तरावर पोहोचले, यात त्यांच्या पत्नी निशा छाब्रिया यांचे मोठे योगदान आहे. निशा यांच्या आठवणी लोकांच्या मनात नेहमी ताज्या राहतील.
रिद्धी व्हिजन मेट्रोकास्ट प्रायव्हेट इंडिया लिमिटेड, जीटीपीएलचे संचालक नागेश छाब्रिया म्हणाले की, आमच्या कंपनीत 2500 केबल ऑपरेटर्स असून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि पश्चिम बंगालमध्ये सुमारे 10 लाख ग्राहक आहेत. 30 वर्षांचा हा प्रवास सुख-दु:खाचा होता. पत्नी दिवंगत निशा छाब्रिया यांनीही खांद्याला खांदा लावून संस्थेला पुढे नेले. आमची कंपनी जीटीपीएलसोबत हाय डेफिनेशन, कॉम्बो ऑफर्स, ओटीटी, आयपीटीव्हीसह पुढे जात आहे. आमच्या केबल चॅनेलवर इन न्यूजसह स्थानिक वृत्तवाहिन्यांचे प्रक्षेपण, उत्सवांचे थेट प्रक्षेपण आणि प्रादेशिक प्रक्षेपण पाहता येतात. ग्राहकांना दिलेली विश्वासार्ह सेवा हाच आमच्या यशाचा पाया आहे. यानंतर मेट्रोकास्ट प्रायव्हेट इंडिया लिमिटेड (रिद्धी व्हिजन) जीटीपीएलसाठी उत्तम सेवा देणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आदित्य अस्रानी, रिद्धी अस्रानी, सुमुख छाब्रिया, संजना छाब्रिया, हरिश गुलबानी, आदर्श गुलबानी, रवी पाटील, इन न्यूजचे समूह संपादक राजशेखर पाटील, संतोष पर्वतराव, शशिधर कोटे, श्रीश पट्टणशेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर, केबल ऑपरेटर्स, ब्रॉडकास्टर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.









