वृत्तसंस्था/ पर्थ
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला काही दिवसांपूर्वी छातीत वेदना जाणवू लागल्या. लागलीच त्याने रुग्णालयात या समस्येवर वैद्यकीय इलाज करवून घेतला. पाँटिंगची प्रकृती आता पूर्वीप्रमाणे तंदुरुस्त झाली असून त्याचे पुन्हा समालोचन कक्षात पुनरागमन झाले आहे.
विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे सध्या पहिली क्रिकेट कसोटी सुरू असून शनिवारी त्याने काही वेळ क्रिकेटचे समालोचन केले. पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोनवेळा आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्रातील महान क्रिकेटपटू शेन वॉर्न तसेच रॉडनी मार्श यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले होते. त्यामुळे पाँटिंगने छातीतील वेदना सुरू होताच तातडीने रुग्णालय गाठले.









