कोल्हापूर :
रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरणासाठी स्टेशनसमोरील एसटी बसस्थानकाचे शेड हटविले आहे. परंतू या जागेत आता रिक्षा लावल्या जात आहे. यामुळे एसटी बस आत येण्यासाठी अडथळ्यांची शर्यत होत आहे. यासंदर्भात रेल्वेकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी येथील रिक्षा व्यावसायिकांना हटविण्यात आले.
रेल्वे स्टेशनसमोर एसटीचे बसस्थानक होते. रेल्वेतून कोल्हापुरात आलेल्या प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्यासाठी येथून एसटी बस उपलब्ध केल्या आहेत. हा परिसर रेल्वे प्रशासनाचा आहे. परंतू गेल्या काही दिवसांपासून 43 कोटींच्या निधीतून रेल्वेचे सुशोभिकरण सुरू आहे. यामुळे रेल्वेने एसटी बसस्थानकाचे शेड हटविण्याचे पत्र एसटी प्रशासनाला दिले. यानुसार एसटीने शेड हटविले आहे. यामुळे प्रवाशांना उन्ह–पावसात बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. एकीकडे रेल्वेने सुशोभिकरणासाठी बस शेड हटविले. परंतू याच ठिकाणी आता रिक्षा उभा राहत आहे. सुशोभिकरणामुळे रेल्वे स्टेशनसमोरील जागेत कामे सुरू केली आहेत. त्यामुळे येथील रिक्षा बसस्थानक परिसरात थांबत असल्याचे समोर आले. परंतू रिक्षा एसटी बस थांब्याच्या ठिकाणीच लावल्या जात असल्याने एसटी आत येण्यास अडचणीचे ठरत आहे.








