प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षाचालकांची चढाओढ : पादचाऱ्यांना ये-जा करणे मुश्कील, रहदारी पोलीस खात्याने कारवाई करावी
बेळगाव : सध्या लग्नसराईच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हातही बाजारपेठ गजबजू लागली आहे. अशातच शनिवार खूट ते गणपत गल्ली कॉर्नरदरम्यान प्रवासी रिक्षावाल्यांनी ठाण मांडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. प्रवासी मिळविण्यासाठी या ठिकाणी प्रवासी रिक्षांच्या रांगा लागत असून नागरिकांना पायी चालण्यासाठीदेखील रस्ता मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रहदारी खात्याच्यावतीने हेल्मेटसक्ती तसेच कागदपत्र तपासणीच्या नावाखाली विविध ठिकाणी चार ते पाच पोलीस ठाण मांडून थांबत आहेत. मात्र बाजारपेठेत वाहतूक कोंडीकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बाजारपेठेत वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेत गर्दी वाढत असल्याने वाहनांची रहदारी वाढली आहे. गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, कडोलकर गल्ली अशा बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागातील रस्ते गजबजू लागले आहेत. अशा गर्दीमध्ये प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षाचालकांची चढाओढ सुरू आहे. गणपत गल्लीत नेहमी गर्दी असते. प्रवासी मिळविण्यासाठी अशा गर्दीतून सावकाश रिक्षा चालवत जात असतात परिणामी अन्य वाहनांना रस्ता मिळत नाही. त्यामुळे गणपत गल्लीत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
तसेच कंग्राळी, शाहूनगर, महांतेशनगर किंवा उत्तर भागातील प्रवाशांना राणी चन्नम्मा चौकापर्यंत किंवा त्या परिसरातील वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे या भागातील प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षाचालक गणपत गल्ली कॉर्नर ते शनिवार खूट दरम्यान रांगा लावत आहेत. अरुंद असलेल्या या रस्त्यावर दोन्ही बाजूला रिक्षा थांबत असल्याने वाहनधारकांना अडचण होत आहे. दुतर्फा वाहनांचे पार्किंग त्याशेजारी भाजी विक्रेत्यांची गर्दी आणि त्यामध्ये प्रवासी रिक्षाचालकाची गर्दी यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता मिळत नाही. गणपत गल्ली कॉर्नर ते काकतीवेस दरम्यान सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. रहदारी पोलिसांची याकडे दुर्लक्ष झाले आहे. बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेकडे पूर्णपणे कानाडोळा झाला आहे. विना हेल्मेट वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी विविध चौकात तीन ते चार पोलीस थांबतात. पण बाजारपेठेतील रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकही रहदारी पोलीस उपस्थित नसतो. त्यामुळे रिक्षाचालकांचे फावले आहे. याठिकाणी होणारी गर्दी व्यावसायिकांनादेखील डोकेदुखीची ठरत आहे. त्यामुळे येथील गर्दी टाळण्यासाठी रहदारी पोलीस खात्याने आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.









