कोल्हापूर :
अॅटो रिक्षा संघटनांच्या मागणीनुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणकडून रात्री 12 ते सकाळी 5 या वेळी आकारण्यात येणाऱ्या रिक्षा भाड्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी किमान भाडेदराच्या 40 टक्के अतिरिक्त भाडे आकारण्यात येत आहे. सद्या 22 रुपये भाडे आकारण्यात येत होते. त्यामध्ये सुधारणा करुन 25 रुपये आकारण्यात येणार आहेत. तर प्रवाशासोबतच्या साहित्यासाठी 60 बाय 40 सेंटीमीटर आकाराच्या नगासाठी 3 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने 27 फेब्रुवारी भाडेवाढ जाहीर केली. पहिल्या टप्यासाठी 25 रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 23 रुपये अशी भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 मार्चपासून सुरु झाली आहे. दरम्यान, ऑटो रिक्षा संघटनांनी रात्रीच्या वेळी आकारण्यात येणाऱ्या दरवाढीसाठी बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्राधिकरणाने रात्रीच्या वेळी आकरण्यात येणाऱ्या भाडे दरवाढीमध्ये सुधारित दरवाढ केली आहे. यापूर्वी पहिल्या किलोमीटरसाठी किमान देय भाडे 22 रुपये होते. आता 25 रुपये आकारण्यात येणार आहेत. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 18 रुपया ऐवजी 23 रुपये आकारण्यात येणार असून 7 एप्रिल पासून अंमलबजावणी सुरु झाली आहे.
- रिक्षा मीटर प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) नसल्यास कारवाई
रिक्षा मीटर प्रमाणिकरण (कॅलिब्रेशन) करण्यासाठी 3 एप्रिलपासून 2 जुलैपर्यंत मुदत आहे. या मुदतीत रिक्षा चालकांनी रिक्षा मीटर प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. मुदतीत प्रमाणिकरण न केलेल्या रिक्षावर मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी एक दिवस परवाना निलंबन मात्र किमान सात दिवस तथापि कमाल 40 दिवस निलंबन कालावधी राहिल असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी स्पष्ट केले आहे.








