सिव्हिल हॉस्पिटलसमोरील घटना
बेळगाव : रिक्षाचे भाडे ठरवण्यावरून प्रवासी महिला व रिक्षाचालक यांच्यात हाणामारीची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान रोडवरील सिव्हिल हॉस्पिटल गेटसमोर ही घटना घडली आहे. या घटनेत प्रवासी महिला व रिक्षाचालक जखमी झाले आहेत. अल्मास तन्वीर गोकाक (वय 45) राहणार गांधीनगर असे जखमी महिलेचे नाव आहे. रिक्षाचालक महम्मद अन्वर मकानदार (वय 36) राहणार रुक्मिणीनगर यालाही मारहाण झाली असून तोही जखमी झाला आहे. या दोघा जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत.
अल्मास या उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला आल्या होत्या. गुरुवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलसमोरील प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या रिक्षाचालकाकडे त्यांनी विचारणा केली. त्यावेळी रिक्षाचालकाने गांधीनगरसाठी दीडशे रुपयाचे भाडे सांगितले. आम्ही नेहमी 70 ते 80 रुपयाने जातो, दीडशे रुपये खूप होतात, असे अल्मास यांनी सांगितले.
याच मुद्द्यावरून वादावादी होऊन रिक्षाचालकाने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अल्मास यांनी केला आहे. रिक्षाचालकाने मात्र हा आरोप फेटाळला आहे. या घटनेनंतर महिला व त्यांच्या कुटुंबीयांनी रिक्षाचालकाला भररस्त्यात मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून भांडण सोडविले. घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी रात्री मार्केट पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता यासंबंधी अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.









