चार-पाच दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला जोर
वार्ताहर/धामणे
मान्सूनपूर्व पावसाने गेल्या पंधरा दिवसांत जोर केला होता. परंतु गेले चार ते पाच दिवस या पावसाने विश्रांती घेतल्याने धामणे, बस्तवाड, हलगा, नंदिहळ्ळी, राजहंसगड, देसूर, सुळगा (ये.) या भागातील शतेकऱ्यांच्या शेतातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला जोर आला आहे. यंदा पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरुवात करण्यात येत असतानाच मान्सूनपूर्व पावसाने या भागात सतत दहा बारा दिवस लावून धरल्याने येथील शेतकऱ्यांची शिवारातील सर्व कामे थांबली होती. भात पिकाच्या पेरणीला आणि पावसाळी पिके म्हणजे बटाटा, भुईंमूग, रताळी, सोयाबीन पिकांची लागवड थांबली होती. परंतु पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून उघडीप दिल्याने या भागातल सर्व शेतकऱ्यांची शेतातील मशागतीची कामे करत भात पेरणीला सुरुवात केल्याने पेरणीसाठी लागणाऱ्या सामुग्रीची व शेतात काम करणाऱ्या मजुरांची कमतरता भासत असून त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गासमोर चिंतेचे सावट पसरलेले आहे. भात पेरणीसाठी परंपरेप्रमाणे बैलांच्या साहाय्याने भातपेरणी करणारे शेतकरी या भागात तुरळक दिसत असून, माणसांच्या साहाय्याने कुरी ओढून भातपेरणी करण्यात येत होती. परंतु ही पद्धत सुद्धा कमी दिसत असून आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने भातपेरणी जोरात सुरू आहे.









