वार्ताहर /धामणे
धामणे, हलगा, बस्तवाड, जुनेबेळगाव, वडगाव भागात यंदा वळीव पाऊस दमदार झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी शेतातील पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून आता भातपेरणीला सुरुवात केली आहे. पेरणीचे काहीच दिवस राहिल्याने या भागातील शेतकरी वर्ग पेरणी व मशागतीच्या कामात व्यस्त झाला असून ज्या शेतकऱ्यांची पेरणीची जोडणी आहे ते शेतकरी आपापल्या शेतात पेरणी करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांची जोडणी नाही ते एकमेकांच्या मदतीने मशागतीची कामे करत पेरणी करत आहेत. धामणे, बस्तवाड, हलगा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून भातपेरणीला या भागात गेल्या दोन दिवसांपासून जोर आला आहे. सर्वच भागातील शेतकऱ्यांना बैलजोडी बाळगणे या महागाईत परवडणारे नाही. त्यामुळे मोजक्याच शेतकऱ्यांच्या बैलजोड्या आहेत. त्यामुळे 80 टक्के शेतकरी टॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत आहेत. पेरणीचा हंगाम या भागात एकाचवेळी आल्याने ट्रॅक्टरची कमतरता भासत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. यापुढे 4-5 दिवस पावसाने विश्रांती घेतली तर या भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील. देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी या भागात यंदा वळीव पाऊस उशीराने सुरू झाला असून गेल्या चार दिवसापूर्वी सतत चार दिवस पाऊस पडल्याने शिवारात ओलावा जास्त प्रमाणात झाला असून चार दिवस पावसाने उघडीप दिली तर पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला या भागातील शेतकरी सुरुवात करणार असल्याचे या भागातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.









