शेतमजुरांचा तुटवडा, ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल
खानापूर : तालुक्यात भात कापणी आणि मळणीची धांदल सुरू असून शेतकरी उरलेसुरले भात घरी आणण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र निसर्गाकडून शेतकऱ्यांना प्रतिसाद नसल्याने शेतकरी पंख्याद्वारे भाताला वारे देऊन भात घरी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आकाशातील ढगाळ वातावरणामुळे शेतकरी कापलेले भात मळणी करून घरी आणण्याच्या लगबगीत आहेत. खानापूर प्रामुख्याने भात आणि ऊस पीक घेतले जाते. यावर्षी खरीपाची पेरणीही उशिरा झाली होती. त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने भात पिकाची म्हणावी तशी वाढ झालेली नव्हते. शेतकऱ्यांनी कूपनलिकेचे, विहिरीचे आणि नदीतील पाणी लावून कसेबसे पिकवले होते. मात्र भाताची म्हणावी तशी वाढ आणि लोंब धरले नसल्याने भात पिकाचा उतारा 60 टक्क्यापेक्षा कमी असल्याने शेतकरी राहिलेले भात कापून मळणी करून घरी आणण्याच्या प्रयत्नात आहेत. या भाताच्या गवताचा चाऱ्यासाठी शेतकरी उपयोग करतात. यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तालुक्यात सर्वच भागात भातपीक दरवर्षीप्रमाणे नसल्याने शेतकरी नाईलाजास्तव राहिलेले भात कापून घरी आणण्याचा प्रयत्नात आहेत. मात्र मागील आठवड्यात अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात भात पिकाचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात दीपावलीनंतर पुढील एक महिन्याभर सर्वच जमिनीतील भात पिकाची सुगी सुरू होते. मात्र वातावरणात अजिबात गारठा नसल्याने तसेच आकाशात कायम ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी भात पिकावर मोठ्याप्रमाणात परिणाम झाला आहे. उरलेसुरले भात कापून घरी आणण्याच्या लगबगीत शेतकरी आहे. भात कापणी एकाचवेळी सर्वत्र सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी एकमेकांच्या मदतीला जाऊन आपला हंगाम साधत आहे. तर भात कापणीच्या मशीनही तालुक्यात उपलब्ध आहेत. त्यांनाही कायम काम मिळत असून आगाऊ ठरवून भात कापणीसाठी मशीन राखून ठेवली जात आहे. मोजक्याच भात कापणी मशीन असल्याने त्यांचाही हंगाम अगदी जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी निसर्गाशी हात करत पिके पिकवली आहेत. आता भाताची सुगी सुरू असताना देखील निसर्गाकडून शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मळणीनंतर भाताला वारे देण्यासाठी वाराही नसल्याने शेतकऱ्यांनी पंख्याचा उपयोग करून भाताला वारा देऊन भात घरी आणत आहेत. भात अजून ओलसर असल्याने भात वाळवण्याची आवश्यकता आहे.
मात्र ढगाळ वातावरणामुळे भाताला हवे तसे ऊनही मिळत नसल्याने भात वाळवणेही कठीण झाले आहे. या सर्व संकटांशी मात करत शेतकरी आपली सुगी करून पिके सुरक्षितपणे घरी आणण्याच्या प्रयत्नात आहेत.यावर्षी पाऊस सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी झाल्याने याचा परिणाम सर्वच पिकांवर झाला आहे. यात नगदी असलेले पीक उसाचेही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ऐन उसाच्या वाढीच्या वेळीच पावसाने पाठ फिरविल्याने उसाची म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्यामुळे उसाचाही उतारा यावर्षी घटणार आहे. ऊस तोडणीही मोठ्याप्रमाणात सुरू झाली असून तालुका व जिल्ह्याबाहेरील कारखान्यांनी उसाची उचल मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. त्यामुळे यावर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटीच ऊस पिकाची तोडणी संपणार आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याचा लैला साखर कारखान्याचाही कसाबसा जानेवारीपर्यंतच गळीत हंगाम चालण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सरकारने तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केलेला आहे. शेतकऱ्यांना दुष्काळामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची नुकसानभरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.









