बेळगाव : गेल्या काही दिवसापासून हजेरी लावलेल्या परतीच्या पावसाने रविवार दि. 2 नोव्हेंबरपासून उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उघडिपीची संधी साधत भात कापणीला सुरुवात केली असून, रविवारी बांधावर शेतकऱ्यांची धांदल उडाल्याचे पहावयास मिळाले. पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यास महिन्याभरात भात कापणी आणि मळणीची कामे पूर्ण होण्यास मदत होणार आहे. यंदा सुरुवातीपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पिके चांगल्याप्रकारे आली आहेत. बेळगाव तालुक्यात विशेष करून भातपीक घेतले जाते. त्याचप्रमाणे भुईमूग, रताळी, बटाटे, सोयाबीन इतर पिकेही घेतली जातात. मान्सूनपूर्व आणि मान्सून पावसाने साथ दिल्याने बळीराजा सुखावला आहे. पिकेही तरारुन आली आहेत.
भातपीक कापणीला आले असताना गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने सतत हजेरी लावल्याने हातातोंडाला आलेले पीक वाया जाईल, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. वारा, पावसामुळे काही ठिकाणचे भातपीक जमीनदोस्त झाले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास मोठे नुकसान होईल, या भीतीने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या होत्या. शनिवार दि. 1 रोजी देखील सकाळी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. मात्र, रविवारी सकाळपासून ढग दाटून आले नाहीत. ऊन पडल्याने त्याचबरोबर रविवार सुटीचा दिवस असल्याने तालुक्यातील अनेक गावांतून शेतकऱ्यांनी ही संधी साधत भात कापणीला सुरुवात केली. पावसाने अशाचप्रकारे उघडीप दिल्यास शेतकरी सुगी साधून घेणार आहेत. त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात होणार आहे.









