संततधार पावसामुळे भात रोप लागवडीला अनुकूल वातावरण : भात तरुच्या तुटवड्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-कणकुंबी भागात गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून, शेतवडीत सर्वत्र मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे या भागात भातरोप लागवडीच्या कामांना वेग आला आहे. भातरोप लागवडीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकरी वर्गाची एकच धावपळ सुरू आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी वर्ग खरीप हंगामात भात पेरणीऐवजी भातरोप लागवड मोठ्याप्रमाणात करतात. साधारणपणे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भात रोप लागवडीसाठी आवश्यक असलेल्या तरुची पेरणी करण्यात येते. भात रोपांची उगवण झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांच्या कालावधीनंतर भात रोपांची शेतवडीत लागवड करण्यात येते. यासाठी संततधार पाऊस तसेच शेतवडीत मुबलक प्रमाणात नैसर्गिक पाण्याची आवश्यकता असते. पूर्वी बैलजोडी व औताच्या सहाय्याने शेतवडीमध्ये पारंपरिक पद्धतीने पाण्यातील मशागतीची कामे करून, रोप लागवड करण्यात येत होती.
मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षापासून शेतकरी पॉवर टिल्लर, रोटरसारख्या आधुनिक यांत्रिक अवजारांचा वापर करून भातरोप लागवडीसाठी आवश्यक मशागतीची कामे करण्यात येत असल्यामुळे आता भातरोप लागवडीची कामे सोपी झाली आहेत. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासते. भातरोप लागवडीसाठी महिला मजुरांना मोठ्याप्रमाणात मागणी असल्यामुळे परगावच्या महिला मजुरांचा या कामासाठी वापर करण्यात येत असल्याने, मजुरीचे दरदेखील गगनाला भिडले आहेत. प्रतीदिन महिला मजुरी 300 रुपये तसेच पॉवर टिल्लर प्रती तास 600 रुपये भाडे व औताला प्रतिदिन 1500 रुपये असा मजुरीचा दर आकारण्यात येत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात देखील मोठ्याप्रमाणात वाढ झाली असल्याने शेतकरी वर्गांना भातशेती करणे खर्चिक बनले आहे. सध्या या भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भातरोप लागवडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गाची एकच धावपळ सुरू आहे. पावसाने शेतकरीवर्गाला योग्य साथ दिल्यास, भातरोप लागवडीची कामे नागपंचमीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या भागातील शेतजमीन भात रोप लागवडीसाठी अनुकूल असल्यामुळे या भागातील शेतकरी भातरोप लागवडीवरच अधिक भर देतात.
दुबार भात तरुची लागवडही वाया जाण्याची भीती
यावर्षी या भागात मे च्या दुसऱ्या पंधरवड्यापासून मोठ्या प्रमाणात पावसाला प्रारंभ झाल्यामुळे शेतकरी वर्गाने लगबगीने शेतवडीमध्ये भात तरुची पेरणी केली होती. मात्र या भागात अतिवृष्टी सुरूच राहिल्यामुळे पावसामुळे शेतवडीत मोठ्या प्रमाणात पाणी साचून अनेक ठिकाणी भात तरु व बियाणे कुजून गेले आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी वर्गाने भाताची दुबार पेरणी केली होती. मात्र पावसामुळे या भागातील भात तरू मोठ्याप्रमाणात कुजून गेल्यामुळे शेतकरी वर्गांना भातरोप लागवडीसाठी तरुचा तुटवडा भासत आहे. तसेच काही ठिकाणी दुबार भात तरुची पेरणी करण्यात आली. मात्र ती अद्याप लागवडीयोग्य बनली नसल्यामुळे भात रोप लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.









