बळीराजा संकटात, औषध फवारणी : प्रादुर्भाव कमी होण्यास दमदार पावसाची गरज
वार्ताहर/किणये
तालुक्यात खरीप हंगामातील भात हे प्रमुख पीक आहे. या भात पिकाच्या उत्पन्नावर बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शेतकरी आपल्या वर्षभराच्या आहारासाठी भाताचा अधिक प्रमाणात उपयोग करतात. स्वत:साठी लागणारे भात साठवून ठेवून उर्वरित भाताची विक्री करतात. त्यामुळे भात हे महत्त्वाचे पीक आहे. याच भात पिकावर सध्या करपा रोग पडला आहे व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. भात पिकावर करपा रोग पडला असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. सध्या पावसाची रिमझीम सुरू आहे. या रिमझीम पावसामुळे भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. खरीप हंगामात प्रारंभी शेतकऱ्यांनी शिवारात धूळवाफ पेरणी केली. तसेच बहुतांशी प्रमाणात भातरोप लागवड करण्यात आली आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला. मध्यंतरी मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती.
तसेच शेतशिवारात पाणी साचून भातपिके पाण्याखाली गेली होती. या पिकांचे नुकसान झालेले आहे. बासमती, इंद्रायणी, सोना मसूर, मधुरा, भाग्यलक्ष्मी, इंटाण, चिंटू व इतर नवनवीन जातीची भातपिके घेण्यात आली आहेत. शिवारात भात पोसवणीला सुरुवात झाली आहे. मात्र भातपिकांवर करपा रोग व किड पडल्यामुळे भात पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या रोगांमुळे भात रोपांच्या पानावर फिकट डाग पडलेले आहेत. कोवळी रोपे खराब होऊ लागली आहेत. रोपांच्या पान व बुंद्यांवर परिणाम होवून भातरोपे कोमेजून जावू लागली आहेत. करपा रोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकरी विविध प्रकारची औषधे फवारणी करताना दिसत आहेत. तसेच जोरदार पाऊस झाल्यास भात पिकावरील करपा रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.









