धामणे, बस्तवाड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, राजहंसगड, देसूर, सुळगा (ये.) भागातील शेतकरी चिंताग्रस्त
वार्ताहर/धामणे
सततच्या पावसामुळे यंदा भात पिकाला मोठा फटका बसला आहे. पावसाचे पाणी शेतात जास्त दिवस थांबून राहिल्यामुळे भातपिकाचे रोप कुजून बाद झाले आहे. त्यामुळे पेरणी करूनसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांची शेती मोकळी दिसत आहे. आता मोकळ्या जागेत रोप लावायचे झाल्यास रोपांचा दर भरमसाठ वाढल्याचे या भागातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यंदा पावसाची सुरुवात मे महिन्यापासूनच झाली आणि धामणे, बस्तवाड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, राजहंसगड, देसूर, सुळगा (ये.), मासगौंडहट्टी भागातील शेतकऱ्यांना पावसाळी पिकासाठी शेतातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला त्रासदायक ठरले होते. परंतु जून, महिन्यात सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली होती. त्याचा फायदा घेत या भागातील
शेतकऱ्यांनी शेतातील पेरणीपूर्व मशागतीची कामे करतच भात पेरणीला सुरुवात करून घाईघाईने भातपेरणी पूर्ण केली. परंतु पेरणी केलेले भात पिकाचे रोप उगवलेले दिसत असतानाच पुन्हा पावसाने जोर केल्याने भाताची रोपे पाण्याखाली गेली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कारण गेल्या दोन दिवसांत पावसाचा ओघ कमी झाला तरी शिवारात पाणी मात्र म्हणावे तसे कमी झाले नाही. पावसाचे पाणी जास्त दिवस शेतात भरुन राहिल्याने भात पिकाचे रोप बारीक असल्यामुळे रोपाची वाढ खुंटली असून त्यामुळे भातपीक बाद होण्याच्या मार्गावर आहे. आतापासून एक आठवडा जरी पावसाने चांगली उघडीप दिली तर या भागातील भातपीक थोड्या प्रमाणात सुधारण्यास चालना मिळेल, नाहीतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.









