भातपीक करपून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त : रोपलागवडही वाया-उशिरा लागवडीचाही परिणाम
वार्ताहर/गुंजी
गुंजीसह परिसरात भात पिकावर विशिष्ट प्रकारच्या रोगाची लागण झाली असून शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. यावर्षी पावसाने पेरणी हंगामातच थैमान घातल्याने येथील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करुनही भात उगवण झाली नाही तर अनेकांची भात उगवण होऊन देखील शिवारात पाणी तुंबल्याने भात कुजून गेले. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना रोप लागवड करावी लागली आहे. परंतु गेल्या संततधार पावसानंतर आठ-दहा दिवसापासून या परिसरामध्ये कडक ऊन असल्याने उशिरा लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे येथील शिवार पिवळे होऊन तांबूस होऊन करपून जात असल्याने पिकाची वाढ खुंटत आहे.
एकीकडे पावसामुळे काबाडकष्ट करूनही दोनवेळा पेरणी केलेले भात वाया गेले. एवढे होऊनही शेतकऱ्यांनी पुन्हा रोप लागवड केली असली तरी त्यावर अशा प्रकारच्या किडींच्या प्रादुर्भावाने वेढल्याने येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. याविषयी येथील कृषी अधिकाऱ्यांना अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या रोगाच्या अटकावासाठी उपाययोजना करण्यासाठी सहाय्य करण्याची विनंती केली. मात्र सदर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना या रोगाविषयी जाणून घेण्यासाठी कृषी वैज्ञानिकांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला असल्याचे समजते.
उपाययोजनांची गरज
ााविषयी कृषी वैज्ञानिक जी. बी. विश्वनाथ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर रोगाविषयी प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय काही सांगता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणी आणि उपाययोजनेच्या सल्ल्यासाठी वाट पहावी लागणार असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणासाठी त्वरित उपाययोजना राबवण्याची गरज असून गुंजी कृषी अधिकाऱ्यांनी त्वरित प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.









