वार्ताहर/गुंजी
गेल्या दोन-तीन दिवसांपासून गुंजीसह परिसरात जोरदार पाऊस सुरू असून त्यामुळे कापणीस आलेले भातपीक धोक्यात आले असल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या या भागातील माळशिवारातील दोडगा, साळी, आमन, इंद्रायणी यासारखी भातपिके कापणीला आली आहेत. मात्र ऐन कापणी हंगामातच जोरदार पाऊस सुरू झाल्याने येथील भात पिकांची कापणी लांबणीवर पडली आहे. जोरदार वाऱ्यासह दमदार पाऊस पडत असल्याने उभ्या पिकांचे भात झडत आहे तर काही पिके जमीनदोस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत जंगली प्राण्यांकडूनही दररोज पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जंगली प्राणी आणि नैसर्गिक आपत्ती या दुहेरी संकटात येथील शेतकरी सापडला आहे. मागीलवर्षीही अशाच प्रकारे ऐन सुगी हंगामात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे सध्या भात कापणीला आले असले तरी येथील शेतकरी वर्ग पाऊस ओसरल्याशिवाय भातकापणी करणार नसल्याचे बोलले जात आहे.









