पावसानंतर वन्यप्राण्यांच्या सततच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल
वार्ताहर/गुंजी
गुंजी परिसरात गव्यांकडून सतत भात पिकाचे नुकसान होत असून येथील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे. यावर्षी मे महिन्याच्या अखेरीसच दमदार पाऊस झाला. त्याला जोडून मान्सून पावसानेही जोरदार सलामी दिल्याने येथील शेतकऱ्यांच्या भातपेरणीमध्ये व्यत्यय निर्माण होऊन भातपेरणी खोळंबली. अशाही परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी भातपेरणी केलेले भात पावसामुळे उगवले नाही. त्यामुळे दुबार पेरणी केली तर काहींनी भात लागवडीच्या दृष्टीने भाताचे तरु पेरले आणि भातरोप लप्गवडीस प्रारंभ केला. मात्र या भागात गव्यांनी सतत उच्छाद मांडून येथील भातपिकाचे नुकसान करण्याचा सपाटाच सुरू केल्याने येथील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सध्या या भागातील भात लागवड जवळजवळ संपुष्टात आली असली तरी येथील शेतकऱ्यांना भातरोप लागवडीसाठी दोन ते तीनवेळा भातपेरणी करावी लागली. एवढे करूनही अनेक शेतकऱ्यांचे तरुही गव्यांकडून फस्त केल्याने अशा शेतकऱ्यांना शेजारच्या शेतकऱ्यांकडून किंवा परगावाहून भातरोपे आणून लागवड करावी लागली.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी
मात्र दररोज वेगवेगळ्या भागात गवे भातशेतीत शिरून भातपीक खाऊन तुडवून मोठ्याप्रमाणात नुकसान करीत असल्याने शेतकरी वर्ग जेरीस आला आहे. कंदील, बॅटऱ्या, फटाके, बुजगावणे किंवा तारेचे पुंपनही तोडून हे गवे भातपिकात घुसत आहेत. काही शेतकऱ्यांच्या तर झटका करंटलाही न जुमानता भातपिके खात असल्याने शेतकऱ्यांना गव्यांच्या अटकावासाठी कोणताच पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. एकीकडे पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना भात पिकासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट करावे लागले. तर दुसरीकडे कष्टाने केलेल्या भातपिकावर गव्यांचे संकट येत असल्याने येथील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. तरी संबंधितांनी सदर शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी आणि गव्यांचा त्वरित बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी होत आहे.









